पिंपरी-चिंचवडमधील वकीलाचा ‘‘मुळशी पॅटर्न’’ : कासारसाई येथील घटनेमुळे खळबळ!
शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा : वकील अन् साथीदारांनी घटनास्थळावरुन काढला पळ

पिंपरी-चिंचवड : बिल्डर लॉबी, गुंठा मंत्री आणि रिअल इस्टेटमुळे पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. दरम्यान, मुळशी पॅटर्न चित्रपटात स्थानिक शेतकरी, राजकीय वरदहस्त, जमिनी बळकावणे आणि त्यानंतर सुरू झालेली गुंडगिरी यांचे वर्णन दाखवण्यात आले होते. या चित्रपटात जे दाखवलं तेच मुळशीतल्या कासारसाई भागात प्रत्यक्षात पाहायला मिळालं. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बंदूक दाखवणाऱ्या वकिलांचे संदीप भोईर असे नाव आहे. ते धनंजय वाडकर यांचे वकील आहेत. कासारसाई येथील शब्बीर मुलानी आणि वाडकर यांच्यात जमिनीवरून वाद सुरु आहे. मुलानी यांची काही जमीन वाडकरांनी खरेदी केली आहे. मात्र ही जमीन कुळ कायद्यात मोडत असल्याने यासाठी गेली 10 ते 12 वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरु आहे. अशातच आज दुपारी दोनच्या सुमारास वकील संदीप भोईर हे कासारसाईत गेले, तेंव्हा त्या जमिनीच्या ठिकाणी निघाले असता मुलानी कुटुंबात आणि त्यांच्यात वाद झाले.
हेही वाचा – PCMC: चव बदललेली असली तरी पाणी पिण्यायोग्यच; प्रक्रिया करूनच नागरिकांना पाण्याचे वितरण!
याच वादात वकील भोईर यांनी कंबरेचे बंदूक बाहेर काढले, तेंव्हा मुलानी कुटुंब आक्रमक झाले. हे पाहून वकील आणि त्यांच्या साथीदाराने तिथून पळ काढला. आता दोन्ही बाजूच्या मंडळींना हिंजवडी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले असून, पोलिसांकडून चौकशी करुन पुढची कारवाई केली जाणार आहे.