PCMC Update : सोसायटीधारकांचा ओला कचरा उचलणार! महापालिका प्रशासन एक पाऊल मागे!
पिंपरी-चिंचवड सोसायटीधारकांचा असंतोष उफाळल्याने प्रशासन नरमले
![PCMC Update: Wet garbage of society owners will be picked up! Municipal administration a step back!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/PCMC-West-780x470.jpg)
पिंपरी : महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडून गृह निर्माण संस्थांमध्ये निर्माण होणारा ओला कचरा १५ जुलैपासून उचलण्यात येणार नसल्याचे नोटीसद्वारे सोसायट्यांना कळवण्यात आले होते. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला. याबाबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना कसलीही पूर्वकल्पना नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून सोसायटींना देण्यात येणाऱ्या नोटीस त्वरित थांबवण्याचे आदेश ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या साहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच सोसायट्यांचा सर्व कचरा महापालिकेकडून उचलण्यात येणार असल्याचे आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
सोसायटीधारक, महापालिका प्रशासनात वाद…
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे, तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. घर, परिसर, व्यवसाय आदी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला, सुका कचरा वेगवेगळा करणे हे कायदेशीर अनिवार्य केले आहे. सध्या महापालिकेकडून शहराच्या विविध भागातील कचरा गोळा केला जातो. त्यातच ओला आणि सुका कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेने प्रत्येक कुटुंबास तीन प्रकारच्या कुंड्या दिल्या होत्या. या संदर्भातील परिपत्रक यापूर्वी आयुक्तांनी लागू केले होते. मात्र, गृहनिर्माण संस्थांमधील रहिवासी आणि महापालिका प्रशासन यांच्यात टोकाचा वाद निर्माण झाला होता.
महापालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
लोकांचा विरोध वाढू लागल्याने महापालिकेला हा आदेश मागे घ्यावा लागला. महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडून गृहनिर्माण सोसायट्यांबरोबरच हॉटेल, मंगल कार्यालय, खाणावळ, वसतिगृह, उपाहारगृह, शाळा आदींना नोटीस पाठविण्यात येत आहेत. १५ जुलैपासून आपल्यामार्फत निर्माण होणारा ओला कचरा महापालिका उचलणार नसल्याचे त्यांना कळवण्यात आले होते. विशेष म्हणजे अशा नोटीस पाठवण्याबाबत महापालिका आयुक्त अथवा आरोग्य विभागामार्फत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. तरी देखील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडून १५ जुलैचा उल्लेख करून नोटीस पाठवण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांचा गोंधळ उडाला आहे. नोटीस वाटप करण्याची कार्यवाही त्वरित थांबवण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.
ओला कचरा उचलणार नसल्याच्या नोटीस वाटप करण्याची कार्यवाही महापालिकेकडून सध्या सुरू नाही. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडून काही ठिकाणी नोटीस वाटप झाल्या असल्या तरी आता त्या थांबवण्याबाबत त्यांना कळवण्यात आले आहे. त्यामुळे सोसायट्यांचा ओला कचरा महापालिकाच उचलणार आहे.
– गणेश देशपांडे, साहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका.