PCMC: TP Scheme विरोधात चिखली-चऱ्होली ग्रामस्थांची ‘‘संघर्षाचा निर्धार’’!
माजी महापौरांसह ग्रामस्थांचा एल्गार : प्रशासनाची मनमानी चालू देणार नाही

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन शहराचा डीपी आराखडा अंतिम टप्प्यात असतानाही चिखली आणि चऱ्होली गावांमध्ये TP Scheme राबवण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियेमध्ये स्थानिक भूमिपुत्र आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे सदर TP Scheme तातडीने रद्द करावी, अन्यथा महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा निर्धार ग्रामस्थ व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
टाळगाव चिखली येथील श्री गणेश मंदिरामध्ये श्री भैरवनाथ टीपी स्कीम विरोधी कृती समितीच्या वतीने आज ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह चिखली गाव परिसर, जाधववाडी, कुदळवाडी, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती या भागातील भूमिपुत्र, उद्योजक, युवक उपस्थित होते.
महापालिकेचा कारभार लोकशाही पद्धतीने झाला पाहिजे, असे अपेक्षीत असताना प्रशासन मनमानीपणे काम करीत आहे. शहराच्या विकासासाठी भूमिपुत्रांनी जमीनी दिल्या आहेत. ‘‘जमीन आमची माय आहे. तिच्यावर डोळा ठेवणाऱ्या प्रशासनला अद्दल घडवू’’ असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
महापालिका प्रशासनाने TP Scheme बाबत थेट नोटीफिकेशन काढले. आम्हा गावकरी, भूमिपुत्र किंवा माजी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. आमदार महेश लांडगे यांनीही या TP Scheme ला विरोध केला आहे. प्रशासनाची मनमानी आम्ही चालू देणार नाही. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी दाद मागणार असून, चिखली आणि चऱ्होली ग्रामस्थांवर TP Scheme लादण्याचा प्रयत्न हाणून पाडणार आहोत.
– राहुल जाधव, माजी महापौर.
हेही वाचा: PCMC: कायदेशीर प्रक्रिया झाल्याशिवाय ‘पीसीएमसी’ कुदळवाडीमधील मंदिर आणि मस्जिदींना हात लावणार नाही!
आयुक्त शेखर सिंह मनमानीपणे निर्णय घेत आहेत. यापूर्वी कुदळवाडीमध्ये केवळ अनधिकृत भंगार दुकानांवर कारवाई करणार असे अनेकदा आयुक्तांनी म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात सरसकट कारवाई करण्यात आली. त्यामुळे भूमिपुत्र आणि लघु उद्योजकांचे नुकसान झाले. महापालिकेत प्रशासक राजवट आहे. त्याच्या नावाखाली प्रशासन मनमानीपणे TP Scheme लादण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत आमदार किंवा आम्हाला विश्वासात घेणे अपेक्षीत होते. भूमिपुत्रांवर अन्याय कदापि सहन करणार नाही. आम्ही संघर्ष करण्याची भूमिका ठेवली आहे.
– नितीन काळजे, माजी महापौर.