इथे दारू पिऊ नका म्हटल्याने एकास बेदम मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/crime-police-FIR-3.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
घरासमोर काहीजण दारू पीत असल्याने एकाने त्यांना हटकले आणि इथे दारू पिऊ नका असे म्हटले. यावरून चार जणांनी मिळून मज्जाव करणा-यास बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 2) रात्री अकरा वाजता गजानननगर, रहाटणी येथे घडली.
उमेश अरुण मुने (वय 33, रा. गजानननगर, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत पाडुळे (वय 20), अनिकेत पाडुळे (वय 22, रा. गजानननगर, रहाटणी) आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी रात्री फिर्यादी यांच्या घरासमोर दारू पीत बसले होते. फिर्यादी यांनी आरोपींना ‘इथे दारू पीत बसू नका’ असे म्हटले. त्यावरून आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर अन्य आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारून शिवीगाळ केली. त्यांनतर आरोपी तिथून पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार तपास करीत आहेत.