‘‘विज्ञान आविष्कार नगरी’’ला पद्म विभूषण रतन टाटा यांचे नाव द्या!
![Name "Vigyan Avishkar Nagari" after Padma Vibhushan Ratan Tata!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/mahesh-landge.jpg)
- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची आग्रही मागणी
- केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
पिंपरी । प्रतिनिधी
केंद्र सरकार पुरस्कृत योजनेंतर्गत ‘औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड’मध्ये विज्ञान आविष्कार नगरी साकारली जाणार आहे. त्यासाठी तब्बल १९१ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘पद्म विभूषण रतन टाटा विज्ञान आविष्कार नगरी’ असे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक दर्जाची विज्ञान आविष्कार नगरी उभारली जणार आहे. त्याला ‘ भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी’ असे नाव देण्यात येईल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ८ एकर जागा उपलब्ध असून, त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. तर उर्वरित ७ एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्यात येईल. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत यासाठी १९१ कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
एकविसाव्या शतकातील भारत घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणे, हे परिवर्तन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, या अनुषंगिक जिज्ञासा निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा सामाजिक विकासासाठी उपयोग करणे, आनंददायी पद्धतीने विज्ञान शिकवणे, अनुभवात्मक शिक्षण, विज्ञानावर आधारित विविध संकल्पनांचे सादरीकरण, प्रदर्शन आदी बाबी विचारात घेऊन त्याची माहिती आणि ज्ञान विद्यार्थ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पाला पद्म विभूषण रतन टाटा यांचे नाव द्यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवडकरांमधून जोर धरु लागली आहे.
याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, केंद्र सरकार पुरस्कृत योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये १९१ कोटी रुपयांचा विज्ञान आविष्कार प्रकल्प साकारला जाणार आहे. असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहराला दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आभार मानतो. राज्य सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये आज या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. मात्र, या प्रकल्पाला ‘भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, या प्रकल्पाला पिंपरी-चिंचवडच्या विकासात आणि औद्योगिक क्षेत्राला मोलाचे योगदान देणाऱ्या पद्म विभूषण रतन टाटा यांचे नाव द्यावे, अशी आम्हा पिंपरी-चिंचवडकरांची आग्रही मागणी आहे. याबाबत केंद्र सरकारमधील संबंधित मंत्रालयाशी संपर्क करुन पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने लवकरच मागणी करणार आहोत.
₹ 191 crore 'Science Invention' project will be set up in #PimpriChinchwad under a central government sponsored scheme. On behalf of all Pimpri-Chinchwadkars, thank you to Prime Minister Narendra Modi for giving such an ambitious project to the city @narendramodi (1/2) pic.twitter.com/agKN8M83O7
— Mahesh Landge (@maheshklandge) September 2, 2021