मासेविक्रेत्यावर खुनी हल्ला : चौघांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी
मासेविक्रीची गाडी इथे का लावली, अशी विचारणा करत एका टोळक्याने मासे विक्रेत्यावर खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 31) सायंकाळी चऱ्होली येथे घडली.
संदीप शंकर जाधव (वय 38, रा. सावतामाळी तालीम शेजारी, चऱ्होली, ता. हवेली, जि. पुणे) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या मासे विक्रेत्याचे नाव आहे. तानाजी तापकीर (वय 33), धनाजी उर्फ धनंजय चंद्रकांत तापकीर (वय 31, दोघेही रा. वडमुखवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चंद्रकांत वामन तापकीर (वय 61), सचिन इंद्रदेव चव्हाण (वय 27, रा. आदर्शनगर, दिघी) यांच्या विरोधातही खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सीमा संदीप जाधव (वय 40) यांनी मंगळवारी (दि. 1) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास जखमी संदीप जाधव हे आझादनगर चौक, चऱ्होली येथे मासे विक्री करता गाडी लावत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी संदीप यांना कोणाच्या परवानगीने येथे हातगाडी लावली, अशी विचारणा करत वाद घातला. आरोपींनी शिवीगाळ केली. त्यास विरोध केला असता आरोपींनी कोयता व लाकडी दांडा घेऊन संदीप यांच्या डोक्यावर वार केले. सोबत असलेल्या इतर जणांनी सिमेंटच्या विटा उचलून संदीप यांच्या अंगावर फेकून मारल्या. त्यावेळी फिर्यादी सीमा यांचा भाचा सागर रमेश माने हे वाद सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण करून दोघांना गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे तपास करीत आहेत.





