खासगी शाळांसोबत स्पर्धा करणार पालिकेची शाळा

पिंपळे गुरव : सुमारे ४४ वर्षांपूर्वी सुरू झालेली कधी गावच्या गावच्या मारूती मंदिरात व पोस्टाच्या काही खोल्यांमध्ये चालणारी श्री छत्रपती शाहू महाराज या शाळेची इमारत आता भव्य रूपात दिसणार आहे. थेट खासगी शाळांना टक्कर देईल, अशी महापालिकेची शाळा येथे आकार घेत आहे.
४४ वर्षापूर्वी ही शाळा सुरु झाली होती. विद्यार्थ्यांना बसायला पुरेशी जागा नसल्याने तत्कालीन आमदार स्व. आण्णासाहेब मगर यांनी संरक्षण खात्याकडून शाळेसाठी दोन एकर जागा मिळविली. याच जागेत साधे पत्राचे शेड मारून, कालांतराने आरसीसी बांधकाम करून शाळा कायम पुढे सुरू ठेवण्यात आली. आसपास दुसरी शाळा नसल्याने परिसरातील विद्यार्थी या शाळेला पसंती देत होते. परंतु कालांतराने खासगी शाळांचे पेव फुटले. खासगी शाळांच्या भव्य इमारती आणि विविध सुविधा पालक व विद्यार्थ्यांना आकर्षित करु लागल्या.
पोटाला चिमटा काढून वेळ प्रसंगी कर्ज काढत मुलांना खासगी शाळांमध्ये शिकविण्यात पालकांना अधिक रस दिसू लागला. शासकीय शाळा नको म्हणून महापालिकेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. परंतु या शाळेतील शिक्षकांनी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांवर कष्ट घेत शैक्षणिक बाबतीत ओळख निर्माण केली. माजी नगरसेवक शाम लांडे यांनी केलेला पाठपुरावा आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी, स्थापत्य विभागाचे अधिकारी यांनी केलेल्या नियोजनामुळे सुंदर इमारत उभारण्यात आली आहे.
पाच मजली या इमारतीत एकूण २४ वर्ग खोल्या बांधण्यात आल्या असून तळमजल्यावर प्राचार्यांसाठी सुसज्ज कार्यालयासह आॅडेटेरीयम व वर्ग खोल्या तयार करण्यात आले आहे. प्रत्येक मजल्यावर शाळेतील कर्मचा-यांसाठी खोल्या व वर्ग रूम, दुस-या मजल्यावर वाचनालय, खेळाचे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली आहे. तिस-या मजल्यावर स्वतंत्र चित्रकला हॉल, चौथ्या मजल्यावर स्वतंत्र नृत्य, संगीत, कला व हस्तकला, वनस्पती साहित्य ठेवण्यासाठी खोली आहे.
तसेच बहुउद्देशीय हॉल तर पाचव्या मजल्यावर संगणक, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र गणित व भूगोल या सगळ्यांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा असे एकूण ४ हॉल व ५ प्रयोगशाळा, शाळेच्या आवारातच अंतर्गत खेळाचे सुसज्ज मैदान, सुसज्ज शोचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक खोल्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे, आग प्रतिबंधक सुविधा, परिसरात बाल शिवबाला शिक्षणाचे धडे देत असलेल्या माता जिजाऊंचा व बाल शिवाजी असा भव्य पुतळाही तथा प्रतिकृती साकारत आहे. दोन कोटी पंचवीस लाख रूपये खर्चाने ही इमारत उभारण्यात आली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
अत्याधुनिक सुसज्ज इमारतीमधून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता येणार आहे. महापालिकेच्या अशा अत्याधुनिक इमारती साकारणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात उत्साह निर्माण करण्यासारखे आहे.
– सतीश वाघमारे, कार्यकारी अभियंता,स्थापत्य विभाग ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय
महापालिकेच्या शाळेचे बदलते रूप हे खासगी शाळेसारखे होत आहे. महापालिकेने निर्माण केलेल्या भव्य शाळेकडे विद्यार्थी वळले पाहिजे. या आकर्षक इमारतीमध्ये त्याच पद्धतीने दर्जेदार शिक्षण मिळावे या दृष्टीने पालिकेचा प्रयत्न असणार आहे,
– संगिता बांगर, प्रशासन अधिकारी (शिक्षण) वर्ग – १
नव्यानेच बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीमध्ये अद्यायावत सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रयोगशाळा, शौचालये, पिण्याचे पाणी, सुसज्ज अशी भव्य तळमजल्यासह एकूण सहा मजली इमारत तयार झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे. इमारतीचे बांधकाम करतांना सुरक्षेच्या दृष्टीने बारकाईने लक्ष ठेवून काम करण्यात आले आहे.
– महेंद्र देवरे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय