विश्वविख्यात उद्योजक स्व. रतन टाटा यांना ‘‘भारतरत्न’’ मिळण्यासाठी पाठपुरावा करणार; खासदार श्रीरंग बारणे
महानगरपालिकेत रतन टाटा यांचे तैलचित्र आणि शहरामध्ये स्मारक उभारावे टीम पिंपरी चिंचवडची मागणी
![MP Shrirang Barne said that he will follow up to get the 'Bharat Ratna' for world-renowned industrialist Late Ratan Tata.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Shrirang-Barne-3-780x470.jpg)
पिंपरी | भारतात उद्योग विश्वाची पायाभरणी टाटा कुटुंबीयांमुळे झाली आहे. आज पुणे जिल्ह्याचा औद्योगिक पट्टा जागतिक पातळीवर ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखला जातो. पिंपरी चिंचवड मधील टाटा मोटर्स आणि राज्यातील टाटा कंपनीच्या इतर उद्योगामुळे महाराष्ट्र देशात नेहमीच उद्योग क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. कामगारांप्रती आणि सामाजिक उत्तरदायित्व निभवण्यामध्ये देखील टाटा कुटुंबीय नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यामध्ये रतन टाटा यांचे योगदान मोठे आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
आमदार उमा खापरे आणि टीम पिंपरी चिंचवडचे समन्वयक जयदीप उमा गिरीश खापरे यांनी स्वर्गीय रतन टाटा यांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे यासाठी पिंपरी चिंचवड शहरात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत शनिवारी रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा – पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ३१ डिसेंबरला वाहतुकीत मोठे बदल, इथं रस्ते बंद
यावेळी खा. बारणे बोलत होते, आमदार उमा खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम पिंपरी चिंचवडने सुरू केलेले सामाजिक उपक्रम उल्लेखनीय आहेत. यामध्ये रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी मागणी महत्वपूर्ण आहे. मी खासदार या नात्याने केंद्र सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
या अभिवादन सभेला भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, भाजपा शहर पदाधिकारी राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, संजय मंगोडेकर, माजी नगरसेवक माऊली थोरात, शितल शिंदे, अजय पालांडे, अभिषेक बारणे, संतोष कलाटे, अभिषेक देशपांडे, आनंद देशमुख, संजय परळीकर, बिभिषन चौधरी, सुरेश भोईर, निता कुशारे, महेश बरसावडे, गोपाळ केसवानी, दीपक भंडारी आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्वर्गीय रतन टाटा यांचे तैलचित्र आणि शहरामध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून स्मारक उभारावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. आ. उमा खापरे यांनी सांगितले की, टीम पिंपरी चिंचवडचे समन्वयक जयदीप उमा गिरीश खापरे यांनी गुरुवार दि. १९ डिसेंबर पासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. लाखो नागरिकांचे हे स्वाक्षरीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटून देणार आहेत. तसेच रतन टाटा यांचे कार्य घरोघरी पोहोचावे यासाठी टीम पिंपरी चिंचवडच्या वतीने रतन टाटा यांचे छायाचित्र असणारी फ्रेम शहरातील दहा हजार कुटुंबांना घरोघरी जाऊन भेट देण्यात येत आहे. यासाठी टीम पिंपरी चिंचवडचे समन्वयक जयदीप उमा गिरीश खापरे, सुशांत मोहिते, सोमनाथ काळभोर, अनिरुद्ध संकपाळ यांनी कार्यरत आहेत.