स्टार प्रचारकांच्या यादीतून खासदार अमोल कोल्हे यांना ‘डच्चू’ ; क्रेझ ओसरली?
- राष्ट्रवादीकडून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर
- महात्मा गांधींचा मारेकरी नथूराम गोडसेंची भूमिका साकारल्याने सावध पवित्रा
पुणे । विशेष प्रतिनिधी
‘व्हाय आय किल्ड गांधी’चित्रपटातील नथूराम गोडसे याची भूमिका साकारल्यामुळे संपूर्ण भारतभरातून टीकेचे लक्ष झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना गोवा विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले. विशेष म्हणजे, एकूण २४ जणांच्या यादीत खासदार कोल्हे यांना स्थान न मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या अभिनयाने मिळवलेली क्रेझ महात्मा गांधींचा मारेकरी गोडसेंच्या भूमिकेमुळे आता ओसरली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोवा विधानसभा निवडणूक प्रचारासाठी २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीचे मुख्य स्टार प्रचारक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच असतील, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा ब्रँड चेहरा असलेले शिरूरचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना मात्र स्टार प्रचारकांची यादीत स्थान दिलेले नाही.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध केली आहे. या यादीत शरद पवार यांच्याशिवाय राष्ट्रीय खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, या महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश आहे. इतर सारे स्टार प्रचारक उत्तरेतील आहेत. या यादीत पक्षाचे महाराष्ट्रातील स्टार प्रचारक अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाचा मात्र समावेश नाही.
महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांतील राजकीय नाळ जोडलेली आहे. किंबहुना, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा गोव्यात निश्चितच प्रभाव आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याची भूमिका सुरूवातीला ठेवली होती. दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीने गोव्यात सत्ता असतानाही महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली. त्यामुळे ‘टीम फडणवीस’गेल्या दोन महिन्यांपासून गोव्यात तळ ठोकून आहे. गोव्याच्या विधानसभा मतदार संघांचा विचार करता अवघे ३० ते ३५ हजार मतदान आहे. मात्र, त्यासाठी महाराष्ट्रातील ३ ते ४ लाख मतदारांचे प्रतिनिधीत्व करणारे दोन-दोन आमदार ‘ऑन फिल्ड’गोव्यातील एका मतदार संघात काम करीत आहेत.
वास्तविक, महाराष्ट्रातील २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे स्टार प्रचारक होते. ‘‘शिव सुराज्य’’ यात्रा काढून कोल्हे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ‘टीम फडणवीस’ यांच्याविरोधात रान तापवले होते. त्याचा फायदा राष्ट्रवादीला निश्चितपणाने झाला होता.
दरम्यान, डॉ. कोल्हे यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांची भूमिका केल्याने देशभरातून टीका होवू लागली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे प्रसिद्घीच्या शिखरावर असलेले डॉ. कोल्हे गोडसेंच्या भूमिकेमुळे प्रचंड ट्रोल झाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारवासारव केली. पण, डॉ. कोल्हे यांना आळंदी येथे महात्मा गांधी यांच्या स्मारकावर अभिवादन करून आत्मक्लेश करावा लागला. तरीही सोशल मीडियावर कोल्हे प्रचंड ट्रोल होत आहेत. याचा फटका गोवा विधानसभा निवडणुकीत बसू नये. याकरिता राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी डॉ. कोल्हे यांना वगळले असावे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुनरावृत्ती होणार काय?
गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानंतर आता मार्च-एप्रिलमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूका तोंडावर आहेत. गोव्यातील सावध पवित्र्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारातून भाजपावर प्रहार करणारे डॉ. अमोल कोल्हे यांना बाहेर ठेवले जाईल. कारण, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पुरोगामी विचारांचा प्रखर चेहरा अशी ओळख डॉ. कोल्हे यांनी आपल्या अभिनयातून निर्माण केली होती. त्याला गोडसेच्या भूमिकेमुळे वैचारिकदृष्टया छेद गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आता नव्या स्टार प्रचारक चेहऱ्याची गरज आहे, असे चित्र आहे.