मोशीतील लोटस नंदनवन सोसायटीतील पाणी प्रश्नावर रहिवासी आक्रमक
सोसायटीतील रहिवाशांना टँकरने पाणी खरेदीची वेळ
पिंपरी : मोशी गायकवाड वस्ती येथील लोटस नंदनवन सोसायटीतील रहिवाशांनी पाणीटंचाईच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. दररोज पडणाऱ्या मुसळधार पावसातही सोसायटीतील रहिवाशांना चार ते पाच टँकरने पाणी खरेदी करावे लागत आहे. गेल्या पाच वर्षांपासून सतत तोंड द्यावा लागणाऱ्या या समस्येबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणताही कायमस्वरूपी उपाय निघालेला नाही. त्यामुळे सोसायटीमधील नागरिकांचा संताप शिगेला पोहचला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जी व नियोजनशून्य कारभारामुळे स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या शहरात अजूनही नागरिकांना मूलभूत पाणी सोयीसाठी संघर्ष करावा लागत आहे.
चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी तक्रार केल्यांनतर महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता चेतन देवरे यांना सोसायटीत प्रत्यक्ष भेट घेऊन समस्येची पाहणी करून दिली. पाहणीदरम्यान देवरे यांनी दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, याआधीदेखील अनेक वेळा दिली गेलेली अशी आश्वासने हवेतच विरल्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी आता थेट कृतीची भूमिका घेतली आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
लोटस नंदनवन सोसायटीच्या वतीने झालेल्या बैठकीत एकमताने आक्रमक पाऊल उचलण्याचे ठरविण्यात आले. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेवर महिलांसह हंडा मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतरही जर पाणीप्रश्न सुटला नाही, तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्याला किंवा उमेदवाराला पुढील निवडणुकांमध्ये सोसायटीमध्ये प्रचारासाठी प्रवेश नाकारण्यात येईल. ही भूमिका केवळ लोटस नंदनवनसाठीच नव्हे, तर परिसरातील इतर पाणीटंचाईग्रस्त सोसायट्यांसाठीही चेतावणी ठरेल, असे संजीवन सांगळे यांनी स्पष्ट केले.




