नियोजित ‘एसआरए’ प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा
पिंपरी चिंचवड | दापोडीतील जय भिमनगर, सिद्धार्थ, गुलाबनगर, लिंबोरी वस्ती, महात्मा फुलेनगर येथील नियोजित एसआरए प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने आज (सोमवारी) महापालिकेवर एल्गार महामोर्चा काढण्यात आला. प्रकल्प रद्द करावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली.महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज आयोजित केली आहे. त्यापार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, सनी ओव्हाळ, रमा ओव्हाळ, विनय शिंदे, सिंकदर सुर्यवंशी, अक्षय गायकवाड, प्रीतम कांबळे आदी सहभागी झाले आहेत.
दापोडीतील जय भिमनगर, सिद्धार्थ, गुलाबनगर, लिंबोरी वस्ती, महात्मा फुलेनगर येथील नियोजित एसआरए प्रकल्पाला स्थानिक 90 टक्के नागरिकांचा विरोध आहे. नागरिकांच्या विरोधातील हजारो हरकती आहेत. वीस वर्षांपूर्वी येथे साधी घरे होती. आता दोन, तीन मजले घरे झाली आहेत. येथे अनेक कुटूंबे राहतात. येथील नागरीकांवर एसआरएची टांगती तलवार आहे. नागरिकांकडे सात बारा आहे. मिळकत कर भरतात. एसआरए कायमस्वरुपी रद्द करावे अशी आमची मागणी असल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.