Emotional News: वाढदिवस साजरा न करण्याचा आमदार शंकर जगताप यांचा निर्णय!
अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील निर्णय; वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड | चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप यांनी यंदाचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दिनांक ५ एप्रिल रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम, बॅनर्स, होर्डिंग्ज किंवा सार्वजनिक आयोजन करू नये, असे आवाहन त्यांनी स्नेही, कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे.
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. अजितदादांसारखे विकासाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपणे ही राज्यासाठी मोठी हानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : Water supply planning: ‘‘जलस्वयंपूर्ण पिंपरी-चिंचवड’’ संकल्पनेसाठी भाजपा आग्रही!

तसेच, वाढदिवशी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहणार नसल्याचेही त्यांनी कळविले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन ही राज्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि मोठी हानी आहे. अशा दुःखद प्रसंगी आनंदोत्सव साजरा करणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे यंदाचा माझा वाढदिवस साधेपणानेही न साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, सर्वांनी कोणतेही कार्यक्रम, बॅनर्स किंवा होर्डिंग्ज न लावता या निर्णयाला सहकार्य करावे, ही नम्र विनंती.”
– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





