अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून
गुंडाविरोधी पथकाने १२ तासांत आवळल्या नराधमाच्या मुसक्या

पिंपरी चिंचवड: चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आपल्याबरोबर घराबाहेर नेले. घरापासून अर्ध्या किलोमीटरवर असणाऱ्या निर्जनस्थळी नेत चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्याच कपड्यांनी तिचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना शनिवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक तपास करत रविवारी (१४ डिसेंबर) सकाळीच नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
समीर कुमार मंडल ( वय ३५, सध्या रा. उर्से, ता. मावळ. मूळ रा. जि. गोंडा, झारखंड) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मयत मुलीच्या आईने शनिवारी (१३ डिसेंबर) शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगी ही शनिवारी सायंकाळी घरी तिच्या आठ वर्षांच्या भावासोबत होती. तिचे वडील कामानिमित्त पुण्यात होते. तर, आई स्थानिक कंपनीत कामाला गेली होती. आरोपी समीर मंडल हा मयत मुलीच्या शेजारीच राहतो. त्याने मुलगी एकटीच असल्याचे पाहून तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला घरापासून अर्ध्या किलोमीटरवर असणाऱ्या निर्जन स्थळी नेले. त्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला. आपण केलेला प्रकार मुलगी घरी सांगेल या भीतीने त्याने मुलीच्या पँटने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला.
दरम्यान, मुलगी घरी दिसत नसल्याने रात्री नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मुलगी हरविल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली.
हेही वाचा – “डॉ.डी.वाय पाटील”च्या विद्यार्थ्यांचे आंतरशालेय प्रकल्प स्पर्धेत चमकदार यश
असा झाला खून…
आरोपीं आणि मयत मुलगी ओळखीचे होते. त्यामुळे चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपीने मुलीला निर्जन स्थळी नेले. मात्र, अर्धा किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी त्याने मुलीला दोन ते तीन किलोमीटर वर्तुळाकार फिरवून नेले. निर्जनस्थळी गेल्यावर त्याने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलीच्या पँटने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी मुलीचा मृतदेह आहे त्या अवस्थेत सोडून निघून गेला.
असा पकडला आरोपी…
गुंडा विरोधी पथकाला गुन्ह्याची माहिती कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश माने, पोलिस शिपाई तौसीक शेख, आणि रामदास मोहिते यांचे पथक घटनास्थळी पोहचले. तेव्हा नातेवाईकांनी आरोपी समीर याच्या बरोबर मुलगी चॉकलेट आणलेला गेल्याचे सांगितले. पोलिसांनी कंपनीतून आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, तो गुन्हा कबूल करत नव्हता. घटनास्थळावरून सर्व रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी त्याला बोलते केले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर…
मयत मुलगी ही आई वडिलांची लाडकी मुलगी. आई, वडील, भाऊ आणि बहीण असे सुखी कुटुंब. आई कंपनीत काम करते. वडील कामानिमित्त पुण्याला ये जा करतात. मुलीच्या मृत्यूने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच आरोपी हा सहा वर्षांपासून विवाहित आहे. तेंव्हापासून तो मयत मुलीच्या कुटुंबशेजारी राहत आहे. त्याच्या पत्नीला क्षयरोग झाला आहे. तसेच अपत्यप्रापतीसाठी त्यांचे उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
आरोपी आणि मयत मुलीचे कुटुंब शेजारी शेजारी राहते. आरोपीने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेले. त्यानंतर बलात्कार करून गळा दाबून खून केला. गुंडा विरोधी पथकाला घटनेची माहिती कळताच तत्काळ घटनास्थळी जाऊन तपासाची सूत्रे फिरवत आरोपीला अटक केली.
– हरीश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक, गुंडा विरोधी पथक





