प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली गणित आणि विज्ञानाची गंमत!
शिक्षण विश्व: संत साई स्कूलमध्ये गणित आणि विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
भोसरी येथील संत साई इंग्लिश मिडियम हायस्कूल येथे विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांची गोडी निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उपजत कल्पकतेला वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य गणित आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन डीआरडीओचे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ अशोक नगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना व गणितीय प्रयोग सादर केले. स्मार्ट छत्री, हैड्रोपोनिक शेती, वायू शुद्धीकरण यंत्र, सोलर ट्रॅकर, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा, गवतापासून तयार केलेले कागद, सैनिकांसाठी स्मार्ट शूज, ऊर्जा व पाण्याचे स्रोत, पवन व सौर ऊर्जा, चुंबकसूची आणि न्यूटनचे नियम या संकल्पनांवर आधारित प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.
गणित विभागातही विद्यार्थ्यांनी विविध आकृत्या, नियम, भूमितीय संकल्पना आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले उपक्रम सादर केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपला प्रकल्प समजावून सांगताना आत्मविश्वास व जिज्ञासा याचे दर्शन घडवले.
हेही वाचा : कृष्णा कारखान्याच्या पाणी योजनांचे आधुनिकीकरण करणार : डॉ. सुरेश भोसले
प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांचे तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत अप्रतिम सादरीकरण केले. शाळेच्या वतीने उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर सर यांनी विद्यार्थ्यांना संशोधन आणि नाविन्यपूर्ण विचाराकडे वळण्याचे आवाहन करत शेतकरी, सामान्य नागरिक यांच्या उपयोगी पडणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीकडे विद्यार्थ्यांनी वळावे असे सांगितले. त्यांनी सांगितले की देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका सुनिता ढवळेश्वर, विश्वस्त पायल ढवळेश्वर, उपमुख्याध्यापिका रुपाली खोल्लम, पूजा पावटेकर,.मंजुषा वाळवेकर, स्वाती मोघे, गौरी शिंदे, मालन लिगाडे, शिवकन्या कांगणे यांच्यासह शिक्षक, पालक प्रतिनिधी आणि पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवर्ग, संस्था चालक, पालक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. ‘शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान उपक्रम’ या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले.





