कृषी कायद्याविरोधात पिंपरीत जन आक्रोश आंदोलन
पिंपरी – केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता देऊन आज बरोबर एक वर्ष झाले. त्या पार्श्वभूमीवर या कायद्याविरोधात मागील वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज (सोमवारी) भारत बंद पुकारला असून पिंपरीतही विविध संघटनांनी बंदला पाठींबा दिला आहे.
संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाविकास आघाडी यांच्या वतीने भारत बंद जन आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जन आक्रोश आंदोलन सुरू आहे. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, काशिनाथ नखाते, संदीपन झोंबडे, दिलीप पवार, निरज कडू, संदेश नवले, हमीद इनामदार, पांडूरंग गाडेकर आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
नवीन तीन कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याचा दावा करत मागील एक वर्षांपासून शेतकरी त्या कायद्या विरोधात आंदोलन करत आहेत. कायद्याला राष्ट्रपती यांनी मंजुरी देऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यापार्श्वभूमीवर या कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी आज (सोमवारी) भारत बंद पुकारला आहे. त्याला पिंपरी-चिंचवडमधून प्रतिसाद मिळाला आहे.