कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मराठी दिन उत्साहात
शिक्षण विश्व : विविध स्पर्धा आणि विद्यार्थी कवी संमेलन रंगले

पिंपरी-चिंचवड | चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलीत प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त “मराठी भाषा गौरव दिन “साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या भाषा विभाग प्रमुख प्रा .सुरेखा कुंभार यांनी भाषा विभागातील शिक्षकांच्या सहाय्याने याही वर्षी अनेकविध उपक्रमांचे आयोजन केले.
यावेळी विविध स्पर्धांचे व विद्यार्थी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या कविता सादर केल्या. त्याबरोबरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो गौरव प्राप्त झाला आहे त्याचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी माय मराठी भाषेचे महत्व सांगणारी भाषणे केली.त्याबरोबरच विद्यार्थ्यांना एकपात्री नाटकाची ओळख व माहिती व्हावी यासाठी अनेक कलाकार विद्यार्थ्यांनी एकपात्री नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.
हेही वाचा : ‘अबू आझमींना यूपीमध्ये पाठवा, आम्ही त्यांचा इलाज करू’; योगी आदित्यनाथ भडकले
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी मराठीचा अभिमान म्हणून पारंपारिक वेशभूषा करून हा दिन उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांनी कवी लेखक यांच्याविषयी महिती व मराठी साहित्याविषयी विविध भित्ती पत्रके तयार करून आणली होती. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कमला एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे संस्थापक, सचिव डॉ दीपक शहा तसेच उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाषा विभाग प्रमुख प्रा सुरेखा कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी वैदेही काशीकर हिने केले.