उद्योगांच्या सीईटीपी केंद्राच्या प्रकल्पासाठी जागा अपुरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात उद्योगांच्या सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी (सीईटीपी) मंजूर दीड एकर जागा कमी पडत आहे. या प्रकल्पाचे क्षेत्र आणि क्षमता वाढविण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभारताना पिंपरी-चिंचवड येथील एमआयडीसीबरोबरच आता चाकण आणि तळेगाव येथील एमआयडीसीतून देखील नदीपात्रात मिसळणार्या रासायनिक सांडपाण्याचा विचार केला जाणार आहे.
शहरामध्ये दहा हजारावर लहान-मोठे उद्योग आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होणार्या औद्योगिक सांडपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मात्र, त्याबाबत एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला पुरेसे गांभीर्य नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
भोसरी एमआयडीसी परिसरातील गवळीमाथा, प्लॉट क्रमांक टी-188 येथील दीड एकर जागेत सरासरी एक एमएलडी क्षमतेचा सीईटीपी प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी जागेचे सपाटीकरण करण्यात आले. पावणेदोन वर्षांपूर्वी या प्रकल्पासाठी भूमिपूजन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष काम सुरु झालेले नाही.
हेही वाचा – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची मोशी येथील वसतिगृहाला भेट
पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पीसीएमसी सीईटीपी फाउंडेशन, आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. या प्रकल्पाचे 8 फेब्रुवारी 2023 मध्ये भूमिपूजन करण्यात आले. गेल्या पावणेदोन वर्षात या प्रकल्पाचे काम थंडावले होते. दरम्यान, उद्योगमंत्र्यांनी नुकतीच चिंचवड येथे बैठक घेऊन या प्रकल्पाचे काम तातडीने सुरु करण्याचे आदेश दिले.
या आदेशानंतर आता या प्रकल्पाच्या कामाला गती दिली जाणार आहे. शहरातील प्लेटींग, पावडर कोटींग आणि पेंट या प्रमुख उद्योगांमध्ये तयार होणार्या घातक रसायनांची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रमुख प्रश्न आहे. त्यावर सीईटीपी प्रकल्पात प्रक्रिया गरजेची आहे.
उद्योगांसाठी उभारण्यात येणारे सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र दीड एकर क्षेत्राऐवजी चार एकर क्षेत्रात उभारण्यात यावे, अशी मागणी उद्योजकांनी नुकतीच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.