प्रभाग ५ मध्ये ‘अजित भाऊ गव्हाणे’ यांच्या शिलेदारांची बाजी; घराघरांत पोहोचतोय विकासाचा अजेंडा!
मिशन-PCMC: महिलांच्या हाताला काम, रोजगाराचे ठोस आश्वासन

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मधील राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित गव्हाणे समर्थक) अधिकृत उमेदवार प्रियंका बारसे, अमर फुगे, श्रीमती भीमाताई फुगे (काकी) आणि ॲड. राहुल गवळी यांनी प्रचारात ठोस आघाडी घेतली आहे. ‘अजित भाऊ गव्हाणे’ यांच्या नेतृत्वाखालील या शिलेदारांनी तळागाळातील मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा निर्धार केल्याने प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
संत तुकाराम नगर, नंदनवन कॉलनी, मोरया कॉलनी तसेच पाण्याची टाकी परिसरात उमेदवारांनी पदयात्रा, कोपरा सभा आणि नागरिक संवादाचा धडाका लावला आहे. केवळ घोषणाबाजी न करता, आतापर्यंत केलेली विकासकामे आणि भविष्यातील नियोजनाची माहिती असलेली पत्रके (पॅम्प्लेट्स) घेऊन उमेदवार मतदारांच्या भेटीला जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा : ९८व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी ‘दशावतार’ची निवड; दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाचा डंका

प्रचारादरम्यान महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय दिसून येत आहे. “आजच्या महागाईच्या काळात एका व्यक्तीच्या पगारावर कुटुंब चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळणे ही काळाची गरज आहे,” असे मत प्रियंका बारसे आणि भीमाताई फुगे यांनी व्यक्त केले. महिलांसाठी लघुउद्योग, गृहउद्योग आणि कौशल्य विकास केंद्रे सुरू करून स्वावलंबनाची संधी देण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा विश्वास
नंदनवन कॉलनी व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना ॲड. राहुल गवळी आणि अमर फुगे यांनी स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. “विकासाभिमुख दृष्टिकोन आणि समाजकार्याची तळमळ या जोरावर आम्ही जनतेसमोर जात आहोत,” असे त्यांनी सांगितले. थेट संवादामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभागातील मूलभूत सुविधांपासून रोजगारनिर्मितीपर्यंतचा आमचा विकासाचा अजेंडा स्पष्ट आहे. आम्ही दिलेली आश्वासने ही केवळ शब्दांची फुलोरा नसून, ती प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद आणि इच्छाशक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.
– अमर फुगे, उमेदवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 5.
जनतेचा विश्वास हीच आमची खरी संपत्ती आहे. थेट संवाद, पारदर्शक कामकाज आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाययोजना या माध्यमातून हा विश्वास अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू.
– ॲड. राहुल गवळी, उमेदवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 5.




