वायसीएम रुग्णालयाबाहेर शेकडो परिचारिकांचे काळ्या फिती लावून आंदोलन
![Hundreds of nurses protest outside YCM Hospital with black ribbons](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/paricharika1_202106635292.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
“कायम करा कायम करा, मानधन नर्स स्टाफला कायम करा” अशा घोषणा देत पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाबाहेर परिचारिकांनी आंदोलन केले. कोरोनाच्या काळात अहोरात्र झटणाऱ्या या नर्सला रुग्णालयाने कायमस्वरूपी करावे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे मध्यंतरी कोरोना रुग्णांवरच उपचार केले जात होते. पुणे अथवा पिंपरी मधील गंभीर रुग्ण याठिकाणी दाखल होत. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स स्वतःच्या जीवाची परवा न करता रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. कोरोना काळात या परिचारिकांना कायमस्वरूपी करून घेणार आणि वेतनवाढ देणार असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यांच्या आश्वासनांची पूर्तता तर दूरच मानधनातही कपात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णालयात गेल्या १२ वर्षांपासून या कार्यरत आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याचा ठराव केला होता. मात्र अद्याप त्यांना मानधनावर ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात रात्रंदिवस सेवा करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे ते सांगत आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या काळात मानधनात वाढ करण्याचे सोडून फेब्रुवारीत २ हजार रुपये कपात करण्यात आली. त्याबाबत आयुक्तांना पत्र दिले होते. मात्र त्यावर कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी आज सकाळी काळ्या फिती लावून आंदोलन केले.