जेवणाच्या बिलावरून हॉटेल मॅनेजरला मारहाण: एकास अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/download.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
जेवणाचे एवढे बिल का लावले असे म्हणत एका तरुणाने हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. त्यांनतर मॅनेजरच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना जुना पुणे मुंबई महामार्गावर भक्ती शक्ती चौकाजवळ हॉटेल पूना गेट येथे घडली.
अक्षय तुकाराम उदगिरे (वय 26, रा. ओटास्कीम, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी सुरज श्रीधर शेट्टी (वय 33, रा. निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल पूना गेट येथे नोकरी करतात. सोमवारी (दि. 10) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी अक्षय पूना गेट हॉटेलमध्ये कार मधून आला. जेवणाचे एवढे बिल का लावले असे म्हणून त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करून कमरेच्या बेल्टने मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली. त्यांनतर आरोपीने फिर्यादी यांच्या खिशातून जबरदस्तीने एक हजार रुपये काढून नेले. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.