हिंजवडीचे आयटीयन्स दाखल करणार ऑफलाईन याचिका
हिंजवडीसह गावांचा महापालिकेत समावेशासाठी स्वाक्षरी मोहीम

आयटीयन्स’ची आता आक्रमक भूमिका
पिंपरी चिंचवड : आयटी परिसरातील दैनंदिन समस्यांना आयटीयन्स आता पुरते वैतागले आहेत. अनेकदा मागणी करूनही ना समस्यांचे निराकरण होते, ना शेजारच्या महापालिकेत गावांचा समावेश होतो. त्यामुळे ‘आयटीयन्स’नी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी ऑनलाइन सह्यांची निर्णायक मोहीम राबवीत ते आयटीयन्स, रहिवाशांना भूमिका व्यक्त करायला सांगत आहेत.
पहिल्या टप्प्यात सुमारे सात हजार स्वाक्षऱ्या पूर्ण झाल्यानंतर ही याचिका थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह कोर्टात ऑफलाइन याचिका दाखल करून कायदेशीर लढा उभारण्याचाही मानस आयटीयन्स व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा – सव्वातीन लाख करदात्यांनी घेतला सवलतीचा लाभ
हिंजवडी परिसरात सक्षम आणि एकसंध प्रशासन यावे, नागरी समस्यांचा कायमचा निपटारा, मूलभूत नागरी सेवा सुधाराव्यात आणि नागरिकांचे जीवनमान सुलभ व्हावे, याकरिता राज्य सरकारने तत्काळ निर्णय घेऊन हिंजवडी परिसरातील गावे तत्काळ महापालिकेमध्ये समाविष्ट करावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात येत आहे. याबाबत आयटीन्सचे प्रयत्न सुरू आहेत.