‘नफरत का जवाब नफरत से मिलेगा’; अबू आझमी यांचा राज ठाकरे यांना टोला
!['नफरत का जवाब नफरत से मिलेगा'; अबू आझमी यांचा राज ठाकरे यांना टोला](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/नफरत-का-जवाब-नफरत-से-मिलेगा-अबू-आझमी-यांचा-राज.jpg)
पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतःच्याच राजकारणामुळे त्रस्त आहेत. राज ठाकरे यांनी जे पेरले तेच उगवणार आहे. नफरत का जवाब नफरत से मिलेगा, असे म्हणत राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे, याबाबत त्यांनी उत्तर भारतीय नागरिकांची माफी मागावी अशी ही मागणी महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेश समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी केली आहे. पिंपरी येथे आज आझमी एका कार्यक्रमा दरम्यान माध्यमांशी बोलत होते, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी आझमी म्हणाले की, मोठा हिंदुत्ववादी कोण, हा मुद्दा बहुसंख्यांकांची मते आकर्षित करण्यासाठी पुढे आणला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून पुढे यावे आणि राज्यातील नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच भाजपाचे केंद्र सरकार ५० हजार कोटी रुपये खर्च करून नवीन संसद भवन आणि राष्ट्रपती भवन उभारत आहे. या नवीन इमारतीत नवीन संविधान आणण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. त्याच उद्देशाने पुन्हा पुन्हा मंदिर मशीद वाद उकरून काढला जात आहे. देशातील शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचार, महागाई, पाणी या मुद्द्यांवरील लक्ष विचलित करण्यासाठी भोंग्याचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला जात आहे, अशी टीका आझमी यांनी केली आहे.
देशातील एकंदरीत परिस्थिती भयानक आहे. भाजपाचे नेते हिंदू-मुस्लीम विषयावर बोलतात, परंतु विकासावर बोलत नाहीत. त्यांनी मंदिर-मशीद वादामुळे संविधान धोक्यात आणले आहे. बाबरी मशिदीवरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देशातील मुसलमानांनी स्वीकारला, त्याचा आदर केला. पण आता ज्ञानवापी मशिदीचा नवीन वाद पुढे आणला जात आहे, असेही आझमी पुढे म्हणाले.
भारतीय जनता पार्टीबाबत काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य बरोबर आहे. आगामी काळात भारतात नरसंहार होण्याची भीती आहे. यामध्ये सर्वांचेच नुकसान होईल. दलितांचे आरक्षण आणि मुस्लिमांचा अल्पसंख्यक हा दर्जा संपवण्याचा यांचा कुटील डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. आरक्षणाचा उपयोग वंचितांना होत आहे. परंतु देशात रेल्वे सारखे मोठे सार्वजनिक उद्योग विकले जात आहेत. नोकऱ्या कमी होत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आरोग्य, पाणी या समस्यांवरील नागरिकांचा रोष व्यक्त होऊ नये, म्हणून, विनाकारण पुन्हा पुन्हा हिंदू-मुस्लिम आणि मंदिर-मशीद तसेच हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला जात असून श्रीलंकेसारखी भारताची परिस्थिती होऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी तसेच सर्व पक्षांनी संविधानाचा आदर आणि पालन केले पाहिजे असेही आवाहन अबू आझमी यांनी केले आहे.