breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दहावी, बारावीनंतर पुढे काय? पिंपरी-चिंचवडमध्ये अविनाश धर्माधिकारी यांचे शनिवारी मार्गदर्शन

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने विधायक उपक्रम

पिंपरी | पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पिंपरीतील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (दि. ८) सकाळी दहा वाजता दहावी व बारावीनंतर काय? या करिअर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये देशातील प्रख्‍यात एमपीएससी व युपीएससी स्‍पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे व्‍याख्‍याते, चाणक्‍य मंडल परिवारचे संस्‍थापक संचालक व निवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माध‍िकारी हे दहावी आणि बारावी नंतरचे करिअर, व्‍यक्तिमत्‍व विकास आणि स्‍पर्धा परीक्षांवर पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचे आयुष्याचे करिअर ठरविणारा टप्पा असतो. या परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची प्रक्रिया पार पाडत आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पुढे आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे असा मोठा गहन प्रश्न उभा राहिलेला असतो, अशा विद्यार्थ्यांना नेमके काय करायचे आहे, हे समजत नसल्याने गोंधळलेले असतात. अशात अनेक जण आपल्या मित्राने अमूक क्षेत्र निवडले म्हणून आपणही तेच करू किंवा स्वतः कोणताही विचार न करता घरचे सांगतील त्या क्षेत्राची निवड करतात. मात्र, गोंधळून किंवा इतरांचे ऐकून घेतलेल्या निर्णयांचा त्रास भविष्यात विद्यार्थ्यांना होऊ शकतो. असे होऊ नये म्हणून करिअरच्या संधीबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना अधिक लाभ होईल. योग्य माहितीच्या आधाराने जाणीवपूर्वक निवडलेले करिअर केवळ विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक क्षमता वाढवत नाही, तर देशाची सामाजिक व आर्थिक बाजूदेखील बळकट करत असते.

हेही वाचा     –    ‘नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू तुमच्याबरोबर असले तरी..’; संजय राऊतांचं सूचक विधान 

दहावी आणि बारावी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावरच आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते. पुढील आयुष्याचे यश-अपयश, स्ट्रगल, व्यक्तीचे समाजातील स्थान हे पुढील प्रवेशावर अवलंबून असते आणि याकरिताच पिंपरी-चिंचवडमधील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी चाणक्‍य मंडल परिवारचे संस्‍थापक संचालक व निवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माध‍िकारी यांचे करिअर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले. अविनाश धर्माधिकारी हे विद्यार्थी व पालकांना सर्वात सामान्य करिअर ते अत्यंत दुर्मिळ करिअरची माहिती देतील. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना योग्यतेनुसार पुढील करिअर निवडण्यास मदत होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल. या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमधील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शंकर जगताप यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button