रात्रीस खेळ चाले.. पिंपळे निलखमध्ये नदीपत्रातून अवैध वाळू उपसा सुरू, हजारो ब्रास वाळूची होतेय चोरी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या मुळा नदीतून रात्रीतून हजारो ब्रास वाळूची अवैध चोरी होवू लागली आहे. पुणे जिल्ह्यात नदी पात्रातून वाळू उपसा करण्यास बंदी असताना देखील पिंपळे निलख परिसरातून कित्येक दिवसापासून रात्री जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात आहे. याकडे पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिलदारांचे देखील दुर्लक्ष होत आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराच्या हद्दीवरून वाहणा-या मुळा नदीचे दोन्ही महानगरपालिकेकडून नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरु आहे. नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गंत दोन टप्प्यात हे काम हाती घेतले आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यात पिंपळे निलख येथे नदीकाठावर हे काम सुरु आहे. मात्र, एकीकडे नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरु असताना त्याच कामाचा फायदा घेत वाळू माफीयांनी मुळा नदीतून वाळू तस्करी करण्याची संधी साधली आहे. पिंपळे निलख मुळा नदी परिसरातून अवैधपणे वाळू उपसा करून रात्रीत ट्रॅकर, हायवाद्वारे त्याची वाहतूक केली जात आहे.
हेही वाचा – मेट्रोच्या नवीन मार्गिकांवरील स्थानके अत्याधुनिक
वृक्षतोड आणि नदी पात्रात माती, मुरुम, दगड टाकण्यावरून नदी सुधार प्रकल्पावरून पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करीत आहे. तसे असताना यापेक्षा गंभीर बाब नदीतून वाळू तस्करी करण्याचा प्रकार नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू असताना होत आहे. वाळूचे ढिगारे रात्रीच्या अंधारात ट्रक, हायवा, ट्रॅक्टर भरून इतर ठिकाणी नेले जात आहेत. नदीत वाळू उपसा किंवा वाहतूक करण्यासाठी कोणताही परवानगी महसूल विभागाकडून दिलेली नाही. तसे असताना हा प्रकार शहरात सुरू असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुळा नदीतून रात्रीतून हजारो ब्रास वाळूची चोरी होवून अवैध वाहतूक सुरु असताना देखील पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिदारांकडे रविराज काळे यांनी तक्रार करुनही कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नदी पात्रातून गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन करुन शासनाची महसूलावर पाणी फिरु लागले आहे. गौण खनिजनाचा दंड आकरण्यात यावा, रविराज काळे युवक शहराध्यक्ष आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड यांनी अशी मागणी पिंपरी-चिंचवड तहसिलदार कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
मुळा नदी सुधार प्रकल्प कामाचा फायदा घेवून रात्रीच्या वेळी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरु केला आहे. नदी सुधार प्रकल्पाच्या कामामुळे वाहने घेऊन जाणे सहज शक्य झालेले आहे. त्याचा गैरफायदा घेऊन पिंपळे निलख भागात रात्रीच्या वेळी वाळू उपसा करीत आहेत. नदी पात्रात ठिकठिकाणी वाळूचे ढिगारे दिसत आहेत. कोणत्याही परवानगीविना अशा प्रकारे बेकायदा वाळू उपसा शहरात सुरु आहे. विशेष म्हणजे जेसीबी लावून वाळू उपसा सुरु आहे. ही बाब गंभीर असून पर्यावरणाचा ऱ्हास आहे. याबाबत तहसिलदार कार्यालयाकडे तोंडी तक्रार करुनही संबंधित वाळू उपसा करणा-यांवर अद्याप कारवाई केलेली नाही. त्यांची वाहने जप्त करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले नाही. त्यामुळे वाळू उपसा करण्यात महसूल विभागातील अधिका-यांच्या संगणमताने तर होत नाही ना, अशी शंका आम्हाला येवू लागली आहे.
– रविराज काळे, युवक शहराध्यक्ष आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड