मोबाईल वितरक असल्याचे भासवून मोबाईल दुकानदाराची 20 लाख 35 हजारांची फसवणूक
![Fraud of Rs 20 lakh 35 thousand by pretending to be a mobile distributor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/nakali-nota.jpg)
पिंपरी चिंचवड | मोबाईल वितरक असल्याचे भासवून एका व्यक्तीने पिंपरी येथील एका मोबाईल दुकानदाराकडून लाखो रुपये घेतले. सुरुवातील काही मोबाईल फोन पुरवले. त्यानंतर मात्र 20 लाख 35 हजार रुपये घेऊन मोबाईल पुरविण्यास नकार दिला. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखलक करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2020 ते 18 जुलै 2021 या कालावधीत घडला.राहुल मनोहर लखानी (वय 35, रा. पिंपरी) यांनी याबाबत सोमवारी (दि. 16) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश प्रभाकरराव शेजूळ (रा. औरंगाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश याने फिर्यादी यांना तो मोबाईल कंपनीचा वितरक असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून योगेश याने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी रोख, फोन पे, गुगल पे, क्रेडिट कार्ड, बँक ट्रान्सफर द्वारे पैसे घेतले. सुरुवातीला योगेशने मोबाईल फोन फिर्यादी यांना पुरवले. मात्र नंतर 20 लाख 35 हजार रुपये आगाऊ रक्कम घेऊन मोबाईल फोन पुरवले नाहीत. फिर्यादी यांनी त्यांचे पैसे मागितले असता ‘दिलेली रक्कम अथवा मोबाईल फोन पुरवत नाही. काय करायचे ते कर’ असे म्हणून फिर्यादी यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.