पिंपळे निलख येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची ‘पायाभरणी’
माजी नगरसेवक तुषार कामठे यांचा पुढाकार : परिसरातील नागरिकांसाठी हक्काची सुविधा
!['Foundation laying' of senior citizen recreation center at Pimple Nilakh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Tushar-Kamthe-PCMC-780x470.jpg)
पिंपरी : पिंपळे निलख येथे प्रस्तावित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष महेश इंगवले- पाटील आणि पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष रामदास जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी या विरगुळा केंद्रासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याची उभारणी आता सुरू झाली असून, आगामी ८ महिन्यांमध्ये केंद्राचे काम पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्घाटन प्रसंगी उत्सव कमीटीचे उपाध्यक्ष महेश कामठे, विशाल कामठे, सौरभ गीते उपस्थित होते.
तुषार कामठे म्हणाले की, प्रभाग २६ च्या जेष्ठ नगरसेविका आरती चौंधे व मी सातत्याने विरंगुळा केंद्रासाठी पाठपुरावा करत होतो. तसेच माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मदत केली. तसेच, अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळेच आमचे प्रयत्न यशस्वी झाले. त्याबद्दल मी प्रभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो.
विंरगुळा केंद्रासाठी तब्बल ५७.५० लाख रूपयांचे काम मंजुर झाले असून, २५ लाखाची तरतुद उपलब्ध आहे. त्यामुळे येणाऱ्या ८ महिन्यामध्ये प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा हक्काचे विरंगुळा केंद्र उपलब्ध होणार आहे. ६० बाय ३२ जागेत प्रशस्त सभागृह तसेच तसेच, पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या मजल्याचेही काम हाती घेण्यात येणार आहे.
राजकारण नव्हे, नागरिकांचे स्वप्न पूर्ण करायचे होते…
विरंगुळा केंद्राच्या कामाबाबत मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरीकांना चुकीचे सांगितले जात होते व त्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, माजी नगरसेविका आरती चोंधे आणि आम्हाला कल्पना होती की आमच्या पाठपुराव्याला यश मिळणार आहे. आम्हाला ज्येष्ठ नागरिकांच्या कामामध्ये राजकारण करायचे नव्हते, म्हणून आम्ही उद्घाटनापेक्षा काम चालू करण्यावर भर देत होतो. तसेच, माझ्या ५ वर्षांच्या अजेंड्यामधील आणखी एक काम पूर्णत्वास येत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद होत आहे, अशा भावना माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी व्यक्त केल्या.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/image-33-1024x768.png)