संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप
पिंपरी – संजय गांधी योजनेतून पिंपरी विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना आमदार अण्णा बनसोडे यांचे हस्ते आज (सोमवारी) मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळसेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन राज्य शासनाच्या योजनाचा लाभ सामान्य गरजू नागरिकांना व्हावा, यासाठी पिंपरी विधानसभा क्षेत्रासाठी नुकतीच पालकमंत्र्यांनी आमदार बनसोडे यांच्या शिफारसी वरून समिती स्थापनेचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन केली. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे स्थानिक आमदार असतात. परंतु, बनसोडे यांनी समितीचे अध्यक्ष म्हणून आनंद बनसोडे या दिव्यांग कार्यकर्त्यास संधी दिली.
दरम्यान, या समितीच्या स्थापनेपासून 3 बैठका घेऊन सुमारे 80 प्रकरणांना मंजुरी दिली आहे. यात संजय गांधी निराधार योजनेची 55 प्रकरणे व श्रावणबाळसेवा राज्य निवृत्ती वेतन समितीचे 25 प्रकरणे मंजूर केली आहेत. यापैकी 17 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. चालू महिन्य पासून या लाभार्थ्यांना पेन्शन / सानुग्रह अनुदान सुरु होणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा दिसून आल्या.
कोरोना काळात पती गेल्याने विधवा झालेल्या महिलांना योजनेतून लाभ दिलेला आहे. याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन शासन योजना नागरिकांपर्यंत घेऊन जाऊन त्यांना योजना बद्दल माहिती दिली जाणे अपेक्षित आहे.
या वेळी समितीचे अध्यक्ष आनंद बनसोडे, सदस्य नासरी चौधरी, सदस्या मेघा काळभोर, सदस्य चंद्रकांत कांबळे, माजी नगरसेवक शंकर पांढरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.




