अजित पवारांचा भाजपवर पलटवार! माजी नगरसेवक संदीप वाघेरे राष्ट्रवादीत

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील माजी नगरसेवकांना पक्षात घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केला आहे. पिंपरीगावातील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात माजी नगरसेवकांची फोडाफोडी जोरात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाजपच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांसह दोन माजी नगरसेविकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला होता. त्यानंतर भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार) तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षाला मोठा धक्का देत विविध पक्षांतील १७ माजी नगरसेवकांना भाजपमध्ये सामील करून घेतले होते. यामध्ये ठाकरे सेनेचे शहरप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन माजी उपमहापौर आणि तीन माजी स्थायी समिती अध्यक्षांचा समावेश होता.
हेही वाचा : माणिकराव कोकाटेंची आमदारकी सुरक्षित; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
दरम्यान, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला. संजोग वाघेरे आणि पिंपरीगावातील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे हे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. संजोग वाघेरे आणि त्यांच्या पत्नी, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा वाघेरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर संदीप वाघेरे नाराज झाले होते.
“आपल्याला विश्वासात न घेता संजोग वाघेरे यांना पक्षात घेतले गेले. आम्ही दोघे एकाच पक्षात राहू शकत नाही,” अशी स्पष्ट भूमिका संदीप वाघेरे यांनी घेतली होती. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करत मनगटावर घड्याळ बांधले. यावेळी राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे उपस्थित होते.
संदीप वाघेरे हे प्रभाग क्रमांक २१ पिंपरीगाव अंतर्गत अशोक थिएटर परिसर, वैष्णवीदेवी मंदिर, मासूळकर पार्क, जिजामाता हॉस्पिटल आणि मिलिंदनगर या भागातून इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.





