महिला कामगारांसाठी भयमुक्त एमआयडीसी अभियान

पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे भोसरी एमआयडीसी ई एल ब्लॉक येथे भयमुक्त एमआयडीसी अभियान राबविण्यात आले.
यावेळी भोसरी एमआयडीसी स्पाइन रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार महाडिक उपस्थित होते. महिला कामगारांना कोणतीही समस्या निर्माण झाल्यास पोलिसांतर्फे पूर्ण सहकार्याची भूमिका आणि त्वरित आरोपींना कठोर शासन करण्यात येईल असे सांगण्यात आले.
दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्षा दुर्गा भोर म्हणाल्या की, एमआयडीसी परिसरात हजारो महिला कामासाठी येतात. कामावरुन ये-जा करताना महिलांना छेडछाडीच्या प्रकाराला सामोरे जावे लागते.तसेच अनेक कॉन्ट्रॅक्टरतर्फे महिलांची पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येते. परंतु, गरीब महिला कामगार पोटाचा प्रश्न असल्यामुळे भीतीपोटी हे सर्व सहन करत असतात. याबाबत दुर्गा ब्रिगेड संघटनेकडे अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी, त्यांना लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल!
एमआयडीसी परिसरात अंतर्गत बस सेवा नसल्यामुळे महिलांना खूप अंतर चालत जावे लागते. तसेच रस्त्यालगत महिला स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबना होते. एमआयडीसीच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये पोलीस चौकी आणि पोलीस गस्त सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ५ ते ८ असणे अत्यंत गरजेचे आहे.
दुर्गा ब्रिगेड संघटनेने भयमुक्त एमआयडीसी अभियान हाती घेतले असून या अभियानांतर्गत महिलांना सुरक्षा तसेच मूलभूत समस्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन या समस्या त्वरित सोडविण्याचा निर्धार संघटनेने यावेळी केला. तसेच नोकरदार महिलांना सुद्धा स्वप्रशिक्षणार्थ प्रशिक्षण देण्यात येणार असून महिलांनी स्वतःच आता खंबीर होणे आवश्यक आहे.
यावेळी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर म्हणाले की, महिला कामगारांवर कोणीही अत्याचार केला तरी त्याला त्याच पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. नराधमांना पोलिसांच्या ताब्यात देऊन कायदेशीर कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल.
एमआयडीसीतील सर्व कंपनी मालकांनी आपापल्या कंपन्यांमध्ये महिला तक्रार पेटी बसवून घ्यावी. जेणेकरून महिलांना आपल्या तक्रारी या तक्रार पेटीमध्ये टाकता येतील आणि त्वरित महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल.





