‘शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेबाबत सर्वांनी जबाबदारी घेणे आवश्यक’; आयुक्त शेखर सिंह

पिंपरी : शाळांमध्ये भविष्यातील सुजाण नागरिक घडत असतात. विद्यार्थ्यांची सुरक्षा हा विषय खूप संवेदनशील असून त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सर्वांनी जबाबदारी घेणे आवश्यक असून याबाबत शहरातील सर्व शाळांमध्ये सर्वांनी अत्यंत सजग राहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांच्यासह महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय देखील महत्वाचा आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शहरातील महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील तसेच खासगी शाळांतील सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत विद्यार्थी सुरक्षा- संवाद सत्राचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी उपस्थितांसमवेत संवाद साधताना आयुक्त सिंह बोलत होते.
या संवादसत्रास पद्मश्री गिरीश प्रभुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, अतिरिक्त वाहतूक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, पंकज पाटील, प्रशासन अधिकारी संगिता बांगर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, माध्यमिक प्रशासन अधिकारी राजीव घुले, माध्यमिक शिक्षण अधिकारी बुधा नाडेकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्य समितीच्या जिल्हा सल्लागार डॉ.जयश्री सारस्वत , अर्पण संस्थेच्या प्रतिनिधी नीलम परब, मुस्कान फाऊंडेशनच्या प्रतिनिधी मनिषा कांबळे तसेच महापालिका, खासगी शाळांचे मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक आणि शिक्षक उपस्थित होते.
हेही वाचा – पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॅान रस्त्याला ‘गती’
अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, कोणाचेही लहान मुल असले तरी त्याची सुरक्षितता ही प्राथमिकता असायला हवी. बऱ्याचवेळा शाळेतील विद्यार्थी झालेल्या शोषणाबद्दल घरी सांगायला घाबरतात. अशावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक किंवा शाळा व्यवस्थापन समिती यांची जबाबदारी व भूमिका खुप महत्वाची आहे. मुलाचे लैंगिक शोषण झालेले असल्यास त्याची तक्रार पोलीसांपर्यंत जाणेही खुप महत्वाचे आहे. तसेच शाळेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करून मुलांच्या तक्रारींचे निवारण करणे किंवा त्यांना विश्वासात घेऊन त्यांना मानसिक आधार देणेही गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरात ठिकठिकाणी दामिनी पथकांचीही नेमणूक करण्यात आली असून विविध शाळांना हे भेटी देत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत असणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत हे पथक युद्धपातळीवर काम करत आहे. कोणत्याही महिलेला कोणत्याही क्षणी असुरक्षित वाटल्यास तिने दामिनी पथकाला संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच दामिनी पथकाद्वारे पिंपरी चिंचवड परिसरातील शाळा, महाविद्यालये तसेच हौसिंग सोसायटीच्या आवारात पाचारण करण्यात आले आहे. यामुळे दामिनी पथकातील महिलांचा त्या त्या परिसरातील महिलांशी किंवा शाळा, महाविद्यालयातील मुलांशी संपर्क वाढण्यास मदत मिळणार आहे. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक प्राचार्य यांनीही दामिनी पथकाला सहकार्य करणे गरजेचे असून दामिनी पथक शाळेमध्ये पाहणीसाठी आल्यास त्यांची अडवणूक करू नये, असेही परदेशी यावेळी म्हणाले.
शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे शाळा सुरक्षा लेखापरीक्षण बाबत माहिती दिली. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये शाळा सुरक्षा लेखापरीक्षण यशस्वीरित्या पार पडले असून शहरातील खाजगी शाळांनी याची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. शाळांतील भौतिक सुरक्षेमध्ये शाळेची इमारत, अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा,भूकंप प्रतिबंध, शौचालय, चेतावणी प्रणाली आणि निर्वासन, पिण्याचे पाणी, प्रयोगशाळा सुरक्षा, मध्यान्ह भोजन, क्रीडा सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षितता आदी गोष्टींचा समावेश असून भावनिक आणि वैयक्तिक सुरक्षेमध्ये अपंगत्व समर्थन, वैद्यकीय सहाय्य आणि प्रथमोपचार, आघात व्यवस्थापन, बाल लैंगिक अत्याचार, सामाजिक व भावनिक अत्याचार, सायबर सुरक्षा आदी बाबींचा यात समावेश असल्याचे थोरात यांनी सांगितले.
शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी विद्यार्थी सुरक्षेबाबतचा शासन निर्णय, शालेय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर सत्र याबद्दल संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.
दरम्यान, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्य समितीच्या जिल्हा सल्लागार डॉ.जयश्री सारस्वत यांनी शाळा परिसरात व्यसनास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. अर्पण संस्थेच्या प्रतिनिधी नीलम परब आणि मुस्कान फाऊंडेशनच्या प्रतिनिधी मनिषा कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृतीपर माहिती दिली.
या संवाद सत्राच्या उत्तरार्धात उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती प्रतिनिधी यांनी आपल्या शंका उपस्थित केल्या आणि या शंकांचे निरसन महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील तसेच पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी केले.
उपस्थितांचे आभार सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी मानले, प्रास्ताविक प्रशासन अधिकारी संगिता बांगर यांनी तर सुत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले.





