breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पावसाच्या साचणाऱ्या पाण्यामुळे उद्योजक हैराण

उद्योजकांमध्ये संताप; ‘एमआयडीसी’सह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दुर्लक्ष

पिंपरी : पावसाच्या साठलेल्या पाण्याचा फटका भोसरी एमआयडीसीमधील डायमंड क्राफट्‌स कंपनीला बसला आहे. पाण्यामुळे कंपनीची सुरक्षा भिंत पडली आहे. कामगारांनी देखील त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दुर्गंधीयुक्‍त पाण्यामुळे डासोत्पत्ती वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरून त्याचा त्रास होण्याची भिती कामगारांमध्ये आहे. एमआयडीसी व महापालिकेच्या या कारभाराविरोधात उद्योजक व कामगार तीव्र संताप व्यक्‍त करत आहेत.

पावसाच्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामध्ये पाणी साचल्याने समस्यांची नवीन भर पडत आहे. एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्या पुढील साचून राहिलेल्या पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात ही समस्या भेडसावत आहे.

या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या एमआयडीसीतील डायमंड क्राफ्टसफ. कंपनीसमोर पावसाचे पाणी खुप दिवसांपासून कंपनीच्या समोरील रस्त्यावर साचलेले आहे. पाऊसाचे प्रमाण वाढल्यास पाण्याचा प्रवाह वाढून सर्व पाणी कंपनीमध्ये येत आहे. त्यामुळे कामगारांना काम करणे कठीण होत असून कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. खड्ड्यात पाणी साठल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नाही. सायंकाळच्या वेळी किरकोळ अपघाताच्या घटना देखील घडत आहेत.

हेही वाचा – ‘नॅशनल क्रश’ रिलेशनशीपमध्ये? स्मृती मंधानाच्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

हे पाणी कंपनीमध्ये आल्यामुळे कंपनीची सुरक्षा भिंत देखील पडण्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या बाबत त्वरीत पाण्याचा योग्यरित्या निचरा होण्यासाठी उद्योजक मागणी करत आहेत. पाणी साठून राहिल्यामुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका वाढला आहे. या समस्यांवर काही ठोस उपाययोजना करण्याची मागणी उद्योजक करत आहेत.

कर घेऊनही सुविधा नाही…

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उद्योजकांसाठी मोठा कर आकारला जात आहे. त्या मोबदल्यात उद्योजकांना रस्ते, पाणी आदीसह मुलभूत सुविधांचा पुरवठा करणे आवश्‍यक आहे. मात्र त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कर भरूनही सुविधा मिळत नसतील तर कर का भरावा असा प्रश्‍न उद्योजक उपस्थित करत आहेत.

एमआयडीसी व महापालिकेची ऐकमेकांवर चालढकल…

सुविधा देण्याबाबत एमआडीसी व महापालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. त्यामुळे उद्योजकांची अवस्था ना घर का ना घाट का, अशी झाली आहे. वास्तविक पाहता दोन्ही शासकीय संस्थांनी त्यांच्या अधिकारात येणारी जबाबदारी पार पाडून उद्योजकांना जगविणे गरजेचे आहे. अन्यथा उद्योग स्थलांतर होण्याच्या घटनेत आणखी वाढ होईल, असे उद्योजक सांगत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button