To The Point : कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई..धर्माचे राजकारण… अन् प्रशासनाला न्यायालयाचा ‘बुस्टर’
पिंपरी-चिंचवडच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई
![Encroachment action in Kudalwadi..politics of religion…and the court’s ‘booster’ to the administration](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/PCMC-3-780x470.jpg)
प्रशासनाचा ‘इगो’ दुखावला अन् फिरला ‘सरसकट बुलडोझर’
पिंपरी- चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई म्हणजे पहिल्याच दिवशी सुमारे 18 लाख चौरस मीटर क्षेत्र भुईसपाट करण्याची धाडसी भूमिका महानगरपालिका प्रशासनाने घेतली. ही कारवाई आगामी किमान ८ ते १० दिवस होणार आहे, असे सांगितले जाते. चिखली-कुदळवाडीतील या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे.
एव्हढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने याची पार्श्वभूमी काय? याबाबत ‘महाईन्यूज’ ने प्रशासन आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यामध्ये अतिक्रमण कारवाई… राजकारण आणि प्रशासनाला मिळालेले न्यायालयाचा ‘बुस्टर’ या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
गेल्या दोन- तीन महिन्यांच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड दत्तमंदीर रोड आणि कुदळवाडी या भागात बुलडोझर चालवला आहे. त्यापूर्वी थेरगाव येथील एका धार्मिक स्थळावर केलेल्या कारवाईमुळे एका समाजाचा भावना दुखावल्या होत्या. यावरुन अतिक्रमण कारवाई केवळ कुदळवाडीत नव्हे, तर संपूर्ण शहरात ठिकठिकाणी झालेली आहे, ही बाब अधोरेखित होते. पण, कुदळवाडीच्या बाबतीत प्रशासनाला मोठा फौजफाटा, पोलीस बंदोबस्त आणि न्यायालयाच्या निर्देशांचा आधार व्यावा लागला.
इंद्रायणी नदी प्रदूषण व आगीच्या घटना कळीचा मुद्दा..
अनधिकृत बांधकाम, पत्राशेड आणि भंगार दुकानांचा मुद्दा सर्वप्रथम पुढे आला इंद्रायणी नदी प्रदूषण आणि कुदळवाडीतील आगीच्या घटनांमुळेच. भंगार दुकाने आणि बेकायदेशीर व्यावसायांमुळे नदीचे प्रदूषणात भर पडते आहे, असा दावा प्रशासनाने केला. त्यानंतर कुदळवाडीत भीषण आगीची घटना घडली. इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी महायुतीला सतत ‘टार्गेट’ करण्याची भूमिका ठेवली. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषण हा मुद्दा विधानसभा निवडघुकीत कळीचा मुद्दा ठरला आणि महायुतीची राज्यभरात बदनामी झाली.
महायुती-महाविकास आघाडीचे राजकारण..
विधानसभा निवडणुकीत चिखली-कुदळवाडी या भागात महायुतीच्या विरोधात ‘फतवा’चे राजकारण झाले. त्यावेळी विशिष्ट समाजाकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ देण्यात आली. किंबहुना, महाविकास आघाडीच्या या भागात जाहीर सभा झाल्या. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह अनेक नेत्यांनी ‘‘आम्ही तुमच्या सोबत आहोत..’’ अशा प्रकारचा विश्वास या भागातील अल्पसंख्याक समाजाला दिला. त्यामुळे एकप्रकारे हा समाज ‘पॉलिटिकली ट्रॅप’ झाला. निवडणूक निकालानंतर मतमोजणीमध्ये याचे परिणाम दिसून आले. महायुतीला या भागात कमी मतदान झाले. त्यामुळे विशिष्ट समाजाने महायुतीला मतदान केले नाही, त्यामुळे भाजपाचे स्थानिक आमदार महेश लांडगे यांचे मताधिक्य या ठिकाणी घटले, असे समीकरण दृढ झाले. याबाबत कुदळवाडी आंदोलनात सक्रीय सहभागी असलेल्या मुस्लिम समाजाच्या नेत्या रुहिनाज शेख यांनी जाहीरपणे भाष्य केले आहे.
हेही वाचा : स्वच्छ पाणी, शुद्ध हवेबाबत सरकारला धारेवर का धरत नाही? सोनम वांगचुक यांचा परखड सवाल
सर्वपक्षीय नेत्यांच्या ‘इगो’मुळे तोडगा निघाला नाही..
आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशनामध्ये आमदार महेश लांडगे यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा मुद्दा मांडला. कुदळवाडी भागातील बेकायदा भंगार दुकांनावरील कारवाईची मागणी केली. त्यामुळे कुदळवाडीच्या कारवाईला धार्मिक रंग आणखी गडद झाला. कुदळवाडीत ‘‘मी स्वत: भेट देणार आहे..’’ असा दावा करीत खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा महायुती विरद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष तीव्र केला. त्यानंतर दोनदा कोल्हे शहरात आले. पण, ना महापालिका आयुक्तांना भेटले किंवा कुदळवाडीतील बाधितांना भेट दिली. दुसरीकडे, विधानसभा सभागृहात मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या. या नोटिसांनंतर महापालिका प्रशासन आणि स्थानिक नेते यांनी एकत्रित बसून तोडगा काढणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. आरोप-प्रत्यारोपांमध्ये प्रत्येकाने धन्यता मानली.
न्यायालयाच्या निर्देशांमुळे प्रशासनाला बळ मिळाले..
महानगरपालिका प्रशासनाने सुरूवातीला डीपी रस्ते आणि आरक्षणांवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी ही कारवाई बांगलादेशी व रोहिंग्यांच्या विरोधातील आहे, असा दावा करीत या कारवाईचे ‘क्रेडिट’ घेतले. त्यानंतरच्या काळात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे राजकारण मागे पडले आणि कारवाईला हिंदू- मुस्लिम असा धार्मिक रंग देण्यात आला. कारवाईसाठी फौजफाटा जमा झाल्यानंतर विशिष्ट समाजाला पुढे करुन मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने प्रशासनाने कारवाई स्थगित केली. दरम्यान, काही लोकांनी समाज म्हणून न्यायालयात याचिका दाखल केल्या, तर काहींही वैयक्तिक पातळीवर न्यायालयात दाद मागितली. तांत्रिकदृष्टया रास्त असलेल्या याचिकाकर्त्यांच्या बांधकामांना ‘स्टे’ मिळाला आणि धार्मिक मुद्यांना धरुन केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यामुळे प्रशासनाला मोठे बळ मिळाले आणि पोलीस लवाजमा एकत्र करुन प्रशासनाने कारवाई सुरू केली.
न्यायालयाच्या निर्देशांमुळे प्रशासनाला बळ मिळाले..
दरम्यान, मुस्लिम समाजाच्या नेत्या रुहिनाज शेख यांनी ‘‘सदर कारवाई ही एका समाजापूरती नसून, सर्वधर्मिय नागरिकांच्या बांधकामांवर होत आहे. त्यामुळे केवळ मुस्लिम समाज नाही, तर सर्व समाजाचे लोक यामध्ये भरडले जात आहेत, अशी योग्य भूमिका मांडली होती. पण, काही लोकांच्या धार्मिक रंग देण्याच्या आततायीपणामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. त्या ठिकाणी प्रभावीपणे भूमिका मांडता आली नाही. त्यामुळे सर्वच अनधिकृत बांधकाम आणि पत्राशेड यासह भंगार दुकांनावर बुलडोझर कारवाई सुरू झाली. यामध्ये मुस्लिम समाजासोबतच स्थानिक भूमिपूत्र आणि हिंदू, बौद्ध, शिख, ख्रिश्चन बांधवांसह, राजस्थानी, मारवाडी अशा सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागेले. आंदोलन आणि रास्ता रोकोमुळे एखादा विषय सोडवता येतो. या भाबड्या संकल्पनेतून विशिष्ट समाजाला पुढे करुन तीव्र आंदोलन करीत प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला. पण, प्रशासनाचा ‘इगो’ दुखावल्यामुळे काय होते? याची प्रचिती संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांसह महाराष्ट्राने अनुभवली. कारण, आयएएस आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी एकदा न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर कोणताही ‘कॉम्प्रमाईज’ करीत नाहीत, ही बाब शहरातील राजकारणी आणि विशिष्ठ धर्माचे ठेकेदार यासह या वादावर फुंकर घालणारी मंडळी सोईस्कर विसरली.
आता सगळेच हतबल… ओन्ली सिंग इज किंग…!
कुदळवाडीतील कारवाईत शेकडो एकर जमीन मोकळी होणार आहे. या भागात आता नव्याने विकासाला संधी मिळेलही पण अनेकांचा रोजगार बुडाला. भूमिपुत्रांच्या उत्पन्नाचे स्त्रोत बुडाले. अशा परिस्थितीमध्ये आता प्रशासनावर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ निष्फळ आहे. कारण, बुंदुकीतून गोळी सुटलेली आहे… त्याची शिकार ना कोणता धर्म पाहते… ना कोणती जात..! सरसकट अतिक्रमण कारवाई सुरू झाली असून, मुस्लिम समाजाचे आणि पुरोगामी विचारांचा नारा देणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांना घोड्यावर बसवणारे स्थानिक विविध समाजाचे ठेकेदार आणि हिंदूत्वाचा नारा देणारे आमदार महेश लांडगे कोणीही कारवाई थांबवू शकत नाही. त्यामुळे कुदळवाडीची कारवाई म्हणजे ‘‘एकाबरोबर सारे भुईसपाट’’ अशी झाली आहे. प्रशासनाला मोठे बळ मिळाले आहे. कारण, आयुक्त शेखर सिंग यांनी यापुढील काळात पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वच ठिकाणी टप्प्याटप्प्याने अतिक्रमण कारवाई करणार असा पुन:उच्चार केला आहे.