“एनइपी”मुळे रोजगार निर्मिती; डॉ. शैलेंद्र देवळाणकर
शिक्षण विश्व: पीसीसीओई मध्ये करिअर कट्टा विभागीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पिंपरी | नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार( एनइपी) सुशिक्षित बेरोजगार युवकांना ग्रामपंचायत पासून बहुराष्ट्रीय कंपन्यापर्यंत योग्य तिथे इंटर्नशिप करता येईल. यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल. या इंटर्नशिप मधून शिष्यवृत्ती मिळेल. युवकांना कामाचा अनुभव मिळेल. या अनुभवामुळे करिअर निवडण्यास व आर्थिक स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. रोजगारांचे नवीन पर्याय निर्माण करणे ही काळाची गरज आहे. “एनइपी” मुळे शहरी भागातील औद्योगिकपट्ट्या सह ग्रामीण भागापर्यंत रोजगार निर्मिती होईल. याच्या प्रशिक्षण कलावधीमुळे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होऊन ते गरजू आस्थापनासाठी उपलब्ध होईल. विविध आस्थापना मधील उत्पादन व सेवांमध्ये वाढ होईल आणि दूरगामी पणे राष्ट्रीय जीडीपीमध्ये देखील वाढ होईल असा विश्वास महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग निगडी येथे “करिअर कट्टा विभागीय पुरस्कार वितरण सोहळा व एक दिवसीय कार्यशाळा २०२५” आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात महाविद्यालय आणि करिअर कट्टा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ चे सचिन इटकर, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव लोगोचे अनावरण
डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि प्राध्यापक हे नोकरीसाठीचे केवळ दोन पर्याय दिसतात. एनइपी नुसार करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षांसह विविध आस्थापनांमध्ये इंटर्नशिप साठी मार्गदर्शन मिळते.
यावेळी करियर कट्टाचा पुणे विभागीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यामध्ये पुणे जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक येथील उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालये, प्राध्यापक, प्राचार्य, तालुका समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, डॉक्युमेंटरी बक्षीस, विभागीय प्राचार्य प्रवर्तक, विभागीय समन्वयक, विविध समित्यांमधील विशेष कामगिरीबद्दल सन्मान, करिअर कट्टा प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्या प्राचार्य, प्राध्यापक व महाविद्यालयांचा बक्षीशे देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक यशवंत शितोळे, सूत्रसंचालन प्रा आनंद गांगुर्डे यांनी केले. आभार संजय खिल्लारे यांनी मानले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा.भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई उपस्थित होते.