आषाढी एकादशी निमित्त एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये भक्तिमय पालखी सोहळा उत्साहात
विद्यार्थांकडून समृद्ध संत परंपरा आणि भक्तीपूर्ण संस्कारांचे दर्शन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने भोसरी येथील एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पारंपरिक वारकरी संस्कृतीचा अनुभव देणारा भव्य पालखी सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. टाळ-मृदंगाचा गजर, अभंग, भजन, दिंडी आणि विद्यार्थ्यांच्या आकर्षक सांस्कृतिक सादरीकरणामुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, तैसीन मुलाणी, सुप्रिया मुळे, एकता जाधव आणि निशा वाघमारे यांनी उत्कृष्टरीत्या केले.
या सोहळ्यास पांडुरंग (नाना) गवळी, सौ. सुनीता माई पांडुरंग गवळी, स्वप्नील पांडुरंग गवळी, सौ. कोमल स्वप्नील गवळी, संकल्प पांडुरंग गवळी, मनीषा थोरात, महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री सुरवसे तसेच वैशाली यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नाना आणि माई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी स्वप्नील पांडुरंग गवळी यांनी विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संस्कार आणि जीवनमूल्यांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा खराबे, गीतांजली बडदे आणि अश्विनी मांजरेकर यांनी प्रभावीपणे केले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी तसेच विविध संतांच्या वेशभूषेत पारंपरिक नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पूजा रेड्डी आणि प्रेमलता कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले, तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि संतांच्या वेशभूषेत सादर केलेल्या नृत्याला विशेष दाद मिळाली.
हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू जाणार ‘या’ 3 देशांच्या दौऱ्यावर

विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट नृत्य तयारी अंगारिका पाटील आणि मुस्कान शर्मा यांनी करून घेतली. पालखी सोहळ्याचे महत्त्व पल्लवी तांबे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
समृद्ध संतपरंपरेचे प्रेरणादायी दर्शन
पालखी दिंडी, अभंग, भजन आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा, भक्ती, शिस्त, एकता आणि संस्कार यांचे महत्त्व अनुभवता आले. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देणारा हा पालखी सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील असा प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.





