नेमबाजी प्रशिक्षणासाठी थेरगाव शाळा “रोल मॉडेल स्कूल” म्हणून विकासित करा; माजी नगरसेवक शंकर जगताप
![Develop Thergaon School as a “Role Model School” for shooting training; Former corporator Shankar Jagtap](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/PHOTO1-780x470.jpg)
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना रायफल शुटिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी थेरगाव रायफल ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी या ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन पाहणी केली. हे ट्रेनिंग सेंटर म्हणजे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण देणारे शहरातील “रोल मॉडेल स्कूल” म्हणून विकसित करावे. महापालिका शाळांमधील गोरगरीब विद्यार्थी नेमबाजीत तरबेज होऊन आंतरराष्ट्रीय नेमबाज म्हणून नावारूपाला यावेत यासाठी तेथे सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक शाळेत रायफल ट्रेनिंग सेंटर सुरू आहे. शाळेच्या शिक्षकांनी माजी नगरसेवक अभिषेक बारणे यांच्या मदतीने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना नेमबाजीचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी हे ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे. पार्किंगची जागा बंदिस्त करून हे सेंटर उभारले आहे. रायफल शूटिंगसाठी शिक्षकांनी टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. याठिकाणी १० मीटर रायफल शुटिंगचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम व माजी नगरसेवक अभिषेक बारणे यांनी स्वखर्चाने दोन रायफल दिले आहेत. तसेच पोलिस आयुक्त कार्यालयाने एक रायफल दिले आहे. तीन रायफलीच्या माध्यमातून महापालिका शाळेतील विद्यार्थी नेमबाजीचे धडे गिरवत आहेत. त्यांना राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते प्रशिक्षक विजय रणझुंजार हे मोफत प्रशिक्षण देत आहेत.
भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी या ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन पाहणी केली. तसेच रायफल शुटिंगचाही आनंद घेतला. यावेळी शिक्षण मंडळाच्या माजी सभापती मनिषा पवार, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, सिद्धेश्वर बारणे, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य संदीप गाडे, सामाजिक कार्यकर्ते काळूराम बारणे, तानाजी बारणे, सनी बारणे, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, प्रशिक्षक व नेमबाजीतील राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते विजय रणझुंजारे, शिक्षक कृष्णराव टकले, बन्सी आटवे, ए. व्ही. फुगे, ए. एस. चौगुले, छत्रपती पुरस्कार प्राप्त सोनाली पाटील, राष्ट्रीय खेळाडू सोनाली जाधव आदी उपस्थित होते.
पाहणीनंतर शंकर जगताप यांनी थेरगाव रायफल ट्रेनिंग सेंटर हे नेमबाजी प्रशिक्षणाचे शहरातील “रोल मॉडेल स्कूल” म्हणून विकसित व्हावे, अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. भारताने अनेक आंतरराष्ट्रीय नेमबाज घडवले आहेत. नेमबाजीत भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहेत. नेमबाजीला मिळालेले जागतिक वलय पाहता पिंपरी-चिंचवड शहरातूनही आंतराष्ट्रीय नेमबाज तयार करण्याच्या उद्देशाने थेरगाव रायफल ट्रेनिंग सेंटर उपयुक्त ठरेल. महापालिका शाळांमध्ये अनेक नेमबाज शिक्षण घेत आहेत. या नेमबाजांना चांगले आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी थेरगाव रायफल ट्रेनिंग सेंटरमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शंकर जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.