चऱ्होली बुद्रुक, कोतवालवाडी येथे निस्वार्थ सेवेतून दत्त जयंती उत्सव!
सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा साळुंके यांची भक्ती : दिपक साळुंके यांच्या पुढाकाराने महाप्रसाद सेवा

पिंपरी | चऱ्होली बुद्रुक, कोतवालवाडी परिसरातील दत्तभक्तांनी यंदाची दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी केली. सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा साळुंके आणि त्यांचे पती दीपक साळुंके यांच्या पुढाकारातून गेल्या चार वर्षांपासून सुरू झालेला हा भक्तीपरंपरेचा उपक्रम यंदाही अधिक भक्तीभावाने संपन्न झाला. धार्मिक कार्यक्रमांची शृंखला, महाप्रसाद आणि भजन-कीर्तन यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
दीपक साळुंके यांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नारायणपूर येथे श्री दत्त महाराजांचे दर्शन घेण्यापासून या उपक्रमाची प्रेरणा मिळाली. त्या दिवशी अनुभवलेल्या आध्यात्मिक शक्तीने दत्त जयंती दरवर्षी आयोजित करण्याचा मानस दृढ केला. त्यांच्या कार्यालयासमोर उगवलेला पवित्र औदुंबर वृक्ष हा भक्तीसाठी ऊर्जा आणि सकारात्मकतेचा सतत स्रोत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
हेही वाचा : समता-स्वातंत्र्याच्या मूल्यांची अंमलबजावणीच खरे अभिवादन; अतिरिक्त आयुक्त सांडभोर

दत्त जयंतीनिमित्त पारायण, भजन-कीर्तन आणि महाप्रसाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाप्रसादाच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी उसळून संपूर्ण परिसर दर्शन आणि भक्तीने भारला. संपूर्ण आयोजनाची जबाबदारी साळुंके दाम्पत्यांनी स्वतः सांभाळली. यंदाच्या कार्यक्रमात सर्व जिवलग मित्रांनी दिलेला मोलाचा सहभाग, मार्गदर्शन आणि अखंड साथ याबद्दल साळुंके दाम्पत्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.
दत्त जयंतीचा हा उपक्रम भक्ती, प्रेम, सामाजिक ऐक्य आणि निस्वार्थ सेवाभाव यांचा सुंदर संगम ठरला. गावकऱ्यांच्या सहभागामुळे आणि साळुंके दाम्पत्यांच्या उत्साहपूर्ण नेतृत्वामुळे कार्यक्रम यंदाही अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
“श्री क्षेत्र नारायणपूरमध्ये मिळालेल्या भक्तीच्या अनुभवाने मन अधिक निर्मळ होते; तिथून मिळणारी ऊर्जा आपल्याला निस्वार्थ सेवा आणि सत्कर्माच्या मार्गावर दृढ ठेवते.”
– अनुराधा साळुंके, सामाजिक कार्यकर्त्या.





