पिंपरी-चिंचवडमध्ये नगर भूमापन कार्यालयाच्या कामकाजाची ‘‘सूसुत्रता’’
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । भूमी अभिलेख कार्यालय ता. हवेली जि. पुणे अंतर्गत येणारी मनपा हद्दीतील काही गावे नगर भूमापन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांचेशी संलग्न करणेबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जमाबंदी आयुक्तांना दिले आहेत.
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी नगर भूममापन कार्यालयाच्या कामकाजात सूसुत्रता आणण्याबाबत मागणी केली.
महसूल मंत्री बावनकुळे यांना दिलेल्या निवेदानामध्ये म्हटले आहे की, तहसील हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील काही गावे यापूर्वी हवेली तहसील कार्यालय अंतर्गत येत होती. मागील काही कालावधीमध्ये सदर गावे अभिलेख सहीत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्न करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असून, सदर गावे नगर भूमापन कार्यालय पिंपरी चिंचवड या कार्यालयाशी संलग्न करण्यात यावे, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.
नगर भूमापन साठी नागरिकांची पायपीट होणार कमी…
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना जमीन मोजणीकरिता तसेच प्रॉपर्टी कार्ड या कामासाठी हवेली भूमीलेख कार्यालयामध्ये जावे लागते. त्यामुळे नागरिकांची पायपीट होऊन आर्थिक वेळेचे नुकसान होते सर्वाना एकाच ठिकाणी सर्व सरकारी सुविधा मिळण्याकरिता सोयीचे होईल. त्या अनुशंगाने, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चऱ्होली, चोवीसावाडी, डूडूळगाव, मोशी, चिखली, देहु, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावे नगर भूमापन अभिलेख पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी संलग्न करण्यात येणार आहेत.