Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकला बदली; श्रावण हर्डीकर यांची प्रभारी आयुक्तपदी नियुक्ती

पिंपरी | कार्यकाळ समाप्तीमुळे चर्चेत असलेले पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची मंगळवारी बदली करण्यात आली आहे. नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली असून पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार आता श्रावण हर्डीकर सांभाळणार आहेत. दरम्यान हर्डीकर यांची पिंपरी चिंचवडच्या प्रभारी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती झाल्याचे अप्पर मुख्य सचिव सेवा विराधा यांनी पत्राद्वारे पिंपरी चिंचवड महापालिकेला कळविले आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी शेखर सिंह यांची 18 ऑगस्ट 2022 रोजी नियुक्ती झाली होती. नियुक्तीपासूनच आयुक्त शेखर सिंह यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. कथित वाकड टीडीआर घोटाळ्यात सहभाग असल्याच्या आरोपांमुळे ते चौकशीच्या भोवऱ्यात सापडले होते. मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, कुदळवाडी येथे झालेली कारवाई, चिखलीच्या नगररचना (टीपी) योजनेचा भंग, चऱ्होली मधील टीपी कडे दुर्लक्ष अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांमुळे त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर टीका झाली. नुकत्याच जाहीर झालेल्या विकास आराखड्यामुळे (डीपी) अनेक नागरिकांचा रोष देखील त्यांनी ओढावून घेतला होता. ग्रीन झोनचे निवासी क्षेत्रात रूपांतर करून बिल्डर लॉबीला फायदा करून दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

हेही वाचा       :      अतिवृष्टीने उध्वस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा हातभार; ३१ हजार कोटींचं पॅकेज जाहीर 

जून महिन्यामध्ये भोसरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेखर सिंह यांच्या बदलीचे संकेत दिले होते. त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे त्यांची लवकरच बदली होईल असे संकेत पालकमंत्र्यांनी दिले होते अखेर बदली आदेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.

हर्डीकर प्रभारी आयुक्तपदी

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणाऱ्या श्रावण हर्डीकर यांच्याकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘प्रभारी’ कारभार सोपवण्यात आला आहे. हर्डीकर यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. हर्डीकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील समजले जातात. हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना काळात अतिशय उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण आहे. कोरोना संकट काळामध्ये पिंपरी चिंचवड उद्योगनगरी मधील कामगारांना योग्य व्यवस्था पुरवून त्यांच्या स्थलांतराला थांबविण्याचे काम हर्डीकर यांनी उत्तम प्रकारे केले होते. कोरोना काळामध्ये शहरवासीयांना चांगल्या आरोग्यसेवा देण्याबरोबरच कोरोनाला थोपवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. या काळात त्यांनी त्यांच्या उत्तम प्रशासकीय कामकाजाची चुणूक दाखविली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button