अतिवृष्टीने उध्वस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा हातभार; ३१ हजार कोटींचं पॅकेज जाहीर

मुंबई | महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं मदतपॅकेज जाहीर केलं आहे. तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं हे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचं आणि शेतकऱ्यांच्या घरांचं, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक ठिकाणी जमीनही खरडून गेली. त्यामुळे आता पुढच्या रब्बीचे पिकेही त्या ठिकाणी घेता येणार नाहीत. मात्र, शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी आता निर्णय घेतला आहे. राज्यात १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती. त्यापैकी ६८ लाख ७९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी मदत करत आहोत, त्यामध्ये २९ जिल्हे, २५३ तालुके आणि २०५९ मंडळांचा समावेश आहे.
हेही वाचा : पीसीसीओईची टेबल टेनिस स्पर्धेमध्ये विजयाची ‘हॅटट्रिक’
एकूण सर्व प्रकारची मदत आपण करत आहोत. खरडून गेलेली जमीन, शेती पिकांचं नुकसान, मृत जणावरांबाबत मदत असेल, जखमी झालेल्या व्यक्तींना मदत असेल, तसेच आपण तात्काळ १० हजार रुपये देत आहोत, ती मदत असेल किंवा यामध्ये ज्या घरांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे, त्या घरांसाठी आता आपण नव्याने घरे बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपण ती घरे बांधणार आहोत. डोंगरी भागातील ज्या घरांचं नुकसान झालं आहे, त्या घरांना आपण प्रत्येकी १० हजारांची जास्त मदत करत आहोत. तसेच शेतकऱ्यांच्या गोठ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांनाही आपण मदत करणार आहोत. ज्या दुकानदारांचं जे नुकसान झालेलं आहे, त्यांनाही आपण मदत करत आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.





