मुख्यमंत्री फडणवीस यांना जीव घेण्याची धमकी; तक्रारीवर कार्यवाहीला वेग
पिंपरी-चिंचवड भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गेवराई पोलिसांची कारवाई सुरू
पिंपरी-चिंचवड : राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे जीव घेण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी ही गंभीर धमकीची बाब तात्काळ लक्षात घेऊन मुख्यमंत्री कार्यालय तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दक्षता दाखवत तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या तक्रारीची दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिस ठाण्याला पाठविले.
हेही वाचा – व्यासपीठीवरील सावळ गोंधळ पाहून अजित पवार उठले अन्….
या आदेशानंतर गेवराई पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपासाची दिशा ठरवून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय नेत्यांवर वक्तव्य करत होता आणि त्याच मालिकेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधातही धमकीपर संदेश पाठविण्यात आला होता.
भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी सांगितले की, “राज्यातील लोकशाही व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा धमक्यांवर तातडीने कार्यवाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री आणि राज्यातील कोणत्याही सार्वजनिक नेत्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींना कायद्याने धडा शिकविणे आवश्यक आहे.”
या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांना उच्च सतर्कतेचा इशारा मिळाला असून डिजिटल पुरावे, आयपी अॅड्रेस ट्रॅकिंग आणि संबंधित व्यक्तीशी संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाकडे केवळ एका धमकीच्या घटनेप्रमाणे न पाहता, राजकीय नेत्यांविषयी निर्माण झालेल्या असामाजिक आणि द्वेषमूलक प्रवृत्तींचा विस्तृत तपास आवश्यक असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यात आगामी राजकीय हालचालींना वेग आला असताना घडलेल्या या घटनेने प्रशासनाला सुरक्षा व्यवस्थेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे.
भाजप आणि फडणवीस समर्थकांनी या कारवाईचे स्वागत केले असून पुढील तपासानंतर दोषींवर कठोर शिक्षेची मागणी करण्यात येत आहे.




