चाकण परिसरातील सराईत गुन्हेगार सनी शिंदे टोळीवर मोका
पिंपरी l प्रतिनिधी
चाकण परिसरातील सराईत गुन्हेगार सनी शिंदे या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियामाद्वारे (मोका) कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिले.
टोळी प्रमुख सनी उर्फ सोन्या सुरेश शिंदे (वय 29, रा. कान्हेवाडी तर्फे चाकण, ता. खेड), राजेश शिवाजी येवले (वय 35), ओंकार अनिल ढोरे (वय 21), प्रसाद शिवाजी येवले (वय 28) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जाळपोळ करणे, खंडणीसाठी गर्दी मारामारी करून दहशत निर्माण करणे, बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र जवळ बाळगणे असे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत.
आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत आरोपींच्या विरोधात मोकाची कारवाई करण्यात आली आहे.