कॅन्सर रुग्णालय महापालिका पीपीपी तत्त्वावर चालवणार
स्थायी समितीची मान्यता; १०० खाटांची क्षमता

थेरगाव येथील उभारले जाणार कॅन्सर रुग्णालय
पिंपरी चिंचवड : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या कॅन्सर रुग्णालय उभारणीला अखेर गती मिळाली आहे. थेरगावमध्ये ३४ गुंठे जागेत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. हे १०० खाटांचे रुग्णालय दोन वर्षांत सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन असून, स्थायी समितीच्या सभेमध्ये गुरुवारी आयुक्त शेखर सिंह यांनी हे रुग्णालय पीपीपी तत्त्वावर चालविण्यास मंजुरी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘वायसीएम’सह आठ मोठी रुग्णालये आहेत. मात्र, एकाही रुग्णालयात कॅन्सरवरील उपचारांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही. गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च सर्वसामान्य रुग्णांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यामुळे कॅन्सर रुग्णालय उभारण्याची मागणी होत होती. त्यानुसार महापालिकेने थेरगावातील नवीन रुग्णालयाशेजारी असलेल्या ३४ गुंठे मोकळ्या जागेत रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले.
हेही वाचा – बीड पोलीस दलात मोठा फेरबदल : 606 कर्मचाऱ्यांच्या बदल्या; SP नवनीत कावंत यांचा मोठा निर्णय
मनपा ठेकेदाराला ३० वर्षांसाठी जागा देणार
सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर रुग्णालय उभारण्यासाठी गुरुवारी स्थायी समितीमध्ये आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. ठेकेदाराला ३० वर्षांसाठी जागा दिली जाणार आहे. ठेकेदाराने दोन वर्षांत ११ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे. यंत्रसामग्री, मनुष्यबळ, रुग्णालय चालविण्याची जबाबदारी ठेकेदाराची असणार आहे.
अल्प दरांत उपचार
केमो थेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया समुपदेशनासारख्या सहायक सेवाही या रुग्णालयात पुरविण्यात येणार आहेत. हे रुग्णालय स्तन, फुफ्फुस, प्रोस्टेट आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगांची पूर्तता करण्यासाठी सुसज्ज असणार आहे. रुग्णालयामध्ये लीनिअर एक्सलरेटर्स, ब्रेकीथेरपी युनिट्स आणि पीईटी-सीटी स्कॅनची सुविधाही देण्यात येणार आहे..महापालिकेने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे दर निश्चित केले आहेत. ठेकेदाराला या दराप्रमाणेच पैसे घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे अल्पदरात उपचार मिळणार आहेत.