चिखलीतील क्रीस्टल सोसायटीतील समस्यांबाबत बिल्डरला ‘दणका’
![Builder slapped over problems in Chikhali Crystal Society](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/MAHESH-LANDGE.jpg)
- प्रवेशद्वारासमोरील काम दोन दिवसांत सुरू करण्याची ग्वाही
- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची बैठक
पिंपरी । प्रतिनिधी
चिखली येथील क्रिस्टर सिटी आणि शेफियर सोसायटीतील रहिवशांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधींना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी चांगलाच ‘दणका’ दिला. त्यामुळे अखेर दोन दिवसांत क्रिस्टल सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्याचे काम सुरू करण्याची ग्वाही संबंधित ठेकेदारांनी दिली आहे. देहु- आळंदी रोडवर लक्ष्मी चौकात येणाऱ्या रस्त्यावर क्रिस्टल सिटी आणि शेफियर कॉऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आहे. या दोन्ही सोसायटीच्या विविध समस्यांबाबत रहिवशांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. याबाबत सोसायटी प्रतिनिधी, बिल्डर प्रतिनिधी आणि महापालिका संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक शुक्रवारी घेण्यात आली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, सोसायटीचे चेअरमन शार्दुल सावंत, कार्यकारी अभियंता राणे, सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, एमएससीबीचे रमेश सुळ, रवी जांभुळकर, सोनम जांभुळकर आदी उपस्थित होते. २०१७ पासून या सोसायटीमध्ये राहत आहेत. सुमारे ४०० कुटुंब याठिकाणी आहेत. सोसायटीच्या समस्यांसाठी महापालिका अधिकारी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, दुर्लक्ष होत असल्याचे तक्रार सोसायटीतील प्रतिनिधींनी केली.
देहु- आळंदी रस्त्याला जोडणारा रस्ता अडवून ठेवल्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, सोसायटीच्या प्रवेशद्वारापाशी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे महिला, दुचाकीस्वार घसरुन पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. दुसरीकडे, सोसायटीच्या परिसरात असलेल्या कारखान्यांमध्ये रात्रीच्या वेळी प्लॅस्टिक जाळले जाते. त्यामुळे मोठा आवाज आणि हवा प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत आहे. बिल्डरकडून रखडलेली कामे पूर्ण करुन देण्यास टाळाटाळ केली जात आहे, अशा समस्या सोसायटीचे चेअरमन शार्दुल सावंत यांनी मांडल्या.
याबाबत माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, क्रिस्टल सिटी सोसायटीच्या बिल्डरने पार्किंग, पाणी, नाले व्हॉल्व्ह बांधणीचे बील, ट्रान्सफार्मर आदी संबंधीत प्रश्न आठ दिवसांत सोडवण्याची सूचना आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारचा रस्ता हा मुख्य रस्त्यापासून उंच झाला होता. त्याचे लेव्हल मुख्य रस्त्याशी काढून देण्यासाठी सोमवारीपासून कामाला सुरुवात होईल. तसेच, देहू- आळंदी रस्त्याला जोडणारा डीपी रस्ता पूर्ण करण्यासाठी संबंधित शेतकरी आणि स्थापत्य विभागाशी पाठपुरावा करून रस्त्याचा विषय मार्गी लावणार आहेत.
- महावितरणच्या मनमानीला चाप…
वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे गृहिणींपासून विद्यार्थींनाही मन:स्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सोसायटीच्या ट्रान्सफॉर्मरमधून महावितरणचे कर्मचारी दुसऱ्याला वीज देतात. त्यासाठी परवानगी नाकारली तर धमकी दिली जाते. ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी सोसायटीने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, दमबाजी करुन वीज घेतली जात आहे, अशी तक्रार सोसायटीधारकांनी केली. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.