पिंपरी / चिंचवड
किरकोळ कारणावरून काळेवाडीत अल्पवयीन मुलास मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी
धक्का लागल्याच्या कारणावरून तीन विद्यार्थ्यांनी त्यांच्याच शाळेतील विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना काळेवाडी येथे बुधवारी (दि. 20) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.
निखिल बाळू जोगदंड (वय 15, रा. काळेवाडी) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत त्याच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा निखील याचा धक्का त्याच्याच शाळेतील मुलाला लागला. या कारणावरून चिडलेल्या तीन विद्यार्थ्यांनी निखील याला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच अज्ञात धारदार शस्त्राने निखिल याच्या डोक्यात वार केले. यामध्ये निखिल गंभीर जखमी झाला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.





