उपराष्ट्रपतींचा तडकाफडकी (ना)राजीनामा..कारण काय?
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानकच राजीनामा देऊन देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यामागील नेमके कारण काय ? याचा शोध अनेक पत्रकारांनी घेतला, पण कारण समजू शकले नाही !
भाजपावर खरोखरच नाराजी ?
एका वृत्तानुसार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी धनखड यांना काहीशी अपमानास्पद वागणूक दिली किंवा त्यांचे निर्णय ऐकले नाहीत, यासाठी संतापून धनखड हे पायउतार झाले, असे समजते. तर दुसरीकडे सायंकाळी साडेपाच वाजता प्रकृतीने ठणठणीत असणारे धनखड प्रकृतीच्या कारणासाठीच साडेसात वाजता राजीनामा का देतात, याचे गौडबंगाल कोणालाच समजले नाही. पण, त्यांनी पद सोडले आहे हे नक्की ! यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ओळींमध्ये त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो, असे म्हटले आहे तर राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा त्वरित स्वीकारला आहे, ही पण वस्तुस्थिती आहे!
तब्येतीचे कारण पुढे..
तब्येतीच्या कारणास्तव धनखड यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा दिला, ज्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात असले, तरी सध्या प्रकृती हेच कारण ग्राह्य धरावे लागेल. वस्तुस्थिती काही दिवसानंतर पुढे येईल, तो भाग वेगळा!
धनखड यांचा कार्यकाळ वादग्रस्त..
२०२२ पासून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या धनखड यांचा कार्यकाळ तसा वादग्रस्तच राहिला. विशेषतः, विरोधी पक्षांशी त्यांचे वारंवार खटके उडाले. भारताच्या इतिहासात कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे ते दुसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत! यापूर्वी, १९६९ मध्ये व्ही व्ही गिरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
हेही वाचा : ‘‘एसबीपीआयएम’’ शैक्षणिक स्वायत्तता अभिमानास्पद; ज्ञानेश्वर लांडगे
राष्ट्रपतींना पत्र लिहून कल्पना..
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. तब्येतीची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार मी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देत आहे. हा निर्णय घटना दुरुस्तीतील अनुच्छेद ६७ (अ) नुसार घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. धनखड यांनी २०२२ मध्ये उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली होती. आपल्या राजीनाम्यानंतर दिलेल्या निवेदनात त्यांनी भारताच्या विकासाचा भाग होण्याचा अभिमान व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक बदलाच्या काळात देशाच्या प्रगतीसाठी काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती,असेही त्यांनी म्हटले आहे.
धनखड यांच्या विरोधात अविश्वास..
राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना धनखड यांचा अनेक वेळा विरोधकांशी वाद झाला, हे जगजाहीर आहे. एकदा तर त्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी हटवण्याची सूचना दिली होती, मात्र, ती नाकारण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात संसदीय प्रक्रियेबाबत अनेक वाद निर्माण झाले, हे पण प्रत्येकाच्या लक्षात आहे.
राजकारणातील लक्षवेधी प्रवास..
धनखड यांचा राजकारणातील प्रवासही लक्षवेधी राहिला आहे. १९८९ मध्ये झुंझुनू (राजस्थान) मतदारसंघातून त्यांनी संसदेत पदार्पण केले. चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम केले. २०१९ मध्ये त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही लक्षवेधी भूमिका बजावली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांनी अक्षरशः जेरीच आणले होते.
‘एनडीए’चे उमेदवार म्हणून प्रकाशझोतात..
२०२२ मध्ये भाजपाप्रणित ‘एनडीए’ने त्यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित केले आणि त्यांनी ५२८ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी मार्गारेट अल्वा यांना फक्त १८२ मते मिळाली होती. धनखड यांच्या राजीनाम्याने राजकारणात नवा रंग भरला असून, त्यांच्या जागी कोण विराजमान होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे
नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा..
जगदीप धनखड यांनी प्रकृतीचे कारण देत उपराष्ट्रपतीपदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाची निवड होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. आता, या पदासाठी थेट नितीश कुमार यांची निवड करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दुसरे म्हणजे राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे त्याचप्रमाणे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचेही नाव स्पर्धेत आले आहे.
भाजपाच्या खासदाराची मागणी..
उपराष्ट्रपतीपद बिहारला द्यावे,
विशेष म्हणजे नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करावे, अशी मागणी भाजपाच्याच एका खासदाराने केली आहे. त्याचे नाव हरिभूषण ठाकूर बचौल असे आहे. हरिभूषण यांच्या या मागणीनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या आहेत.
बिहार विधानसभेत नक्की फायदा !
बिहारमध्ये या वर्षाच्या शेवटपर्यंत विधानसभेची निवडणूक होणार आहे. असे असतानाच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करावे, अशी मागणी आहे. या मागणीचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत. नितीश कुमार यांनी मात्र या मागणीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नितीश कुमार ला आणि बिहारला उपराष्ट्रपती पद दिले गेले तर आणायचे बिहारचे मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पार्टीला मिळू शकेल अशी अटकळ लढवली जात आहे.
राष्ट्रपती पंतप्रधानांचे आभार..
धनखड यांनी आपला राजीनामा सार्वजनिक केला असून त्यांनी आरोग्याचे कारण सांगत हा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुरमू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी अचानक दिलेल्या या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. आता मात्र या पदावर कोणता नेता विराजमान होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दोन गोष्टी महत्त्वाच्या..
धनखड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे, त्यांच्या राजीनामे मागे प्रकृती आश्वास त्याचे कारण आहे की दुसरे काय, हे समजून घेणेही इतकेच महत्त्वाचे ठरणार आहे, हे नक्की!





