थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर
सहा महिन्यांत ५०५ कोटींचा मालमत्ता कर जमा
पिंपरी : महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामहीत ५०५ काेटींचा कर वसूल केला आहे. तीन लाख ९० हजार मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख ३२ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटिसा, नळजोड बंद करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून देयकांचे घरपोच वाटप केले. यामुळे २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीत ५८० कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले हाेते. मात्र, यंदा पहिल्या सहामाहित कर वसुली कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
हेही वाचा – पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
सहा लाख ३२ हजार मालमत्ता धारकांपैकी तीन लाख ९० हजार ३० मालमत्ता धारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत सहा महिन्यांत कराचा भरणा केला आहे. या मालमत्ता धारकांनी ५०५ कोटी नऊ लाख ७९ हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. ऑनलाइन माध्यमातून ३५३ कोटी १३ लाख, विविध उपयोजन १३ कोटी २५ लाख, रोख स्वरूपात ३८ कोटी ९६ लाख, धनादेशाद्वारे ३२ कोटी ३९ लाख, आरटीजीएसद्वारे २० कोटी ११ लाख, डिमांड ड्राफ्टद्वारे एक कोटी ८९ लाख रुपये जमा झाले आहेत.
दरम्यान, तीन लाख ९० हजार ३० मालमत्ता धारकांपैंकी तीन लाख ४३ हजार ५६ निवासी मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. ३२ हजार ३३८ बिगर निवासी, ८६७६ मिश्र, २९८१ औद्योगिक तर २९७५ मोकळ्या जमीन असणाऱ्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. सहा महिन्यांत ६० टक्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यापुढील काळात थकबाकीदारांचा कर वसूल करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. थकीत आणि चालू कर शंभर टक्के वसुली करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.