अण्णा बनसोडेंवर आधी आरोप आता गळ्यात गळे!
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 'खोबरे तिकडे चांगभले'

पिंपरी : सहाच महिन्यापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे विधानसभा सभागृहात काहीच बोलत नाहीत. मतदारसंघात फिरकत नाहीत. समस्यांबाबत आवाज उठवत नाही अशी आरोपांची राळ उठवणाऱ्यांनी आता अण्णा बनसोडे यांचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पिंपरी मतदार संघाचे आमदार असलेल्या बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड काय झाली त्यांचा नागरिक सत्कार करण्याचाही घाट ‘खोबरे तिकडे चांगभले” म्हणणाऱ्यांनी घातला आहे.
विधानसभा उपाध्यक्षपदी पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा बुधवारी (दि 9)उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहाल यांच्याकडून ही माहिती देण्यात आली.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मंतरलेल्या दिवसांचा उजाळा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडे यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत तुतारी या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यावेळी माजी महापौर तथा शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह अनेकांनी अण्णा बनसोडे यांच्यावर टीकेची राळ उठवली होती. अण्णा बनसोडे सभागृहात बोलतच नाहीत. मतदारसंघात पाच वर्षांशिवाय फिरकत नाहीत. पिंपरी मतदारसंघातील झोपडपट्टी भागामध्ये कार्यकर्त्यांना दारू पाजणे हा एकमेव उद्योग अण्णा बनसोडे निवडणुकीच्या आधी करतात आणि निवडून येतात असे देखील आरोप करण्यात आले होते. विधानसभा निवडणूक पार पडली विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाचे चित्रच पालटून गेले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आणि शरद पवार गटाची पीछेहाट झालेली राज्याच्या राजकारणात दिसून आली. यानंतर काठावर बसलेले अनेकांनी तातडीने बेडूक उड्या मारत अजित पवार यांच्या गटात सामील झाले.
याच आरोपांचा धागा पकडत आज पत्रकार परिषदेमध्ये याबद्दल विचारल्यावर बहल म्हणाले की, अण्णा हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले आहेत. ते मतदारसंघात चांगल्या मतांनी निवडून आले आहेत. त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळाले आहे. ते निश्चित शहराचा विकास करतील असे म्हणत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बहल यांनी बगल दिली.
काठावर बसलेले सत्कार कार्यक्रमात सर्वात पुढे!
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानंतर काठावर बसलेले, तळ्यात मळ्यात कायम भूमिका ठेवणारे अनेक जण हिरीरीने पुढे आले आहेत. विधानसभा निवडणुकीत शेवटपर्यंत आपण कोणत्या गटात आहोत हे थेटपणे न सांगणारे, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करत महायुतीतील उमेदवाराच्या विरोधात काम करणारे माजी आमदार विलास लांडे यांनीही या सत्काराच्या कार्यक्रमात कमालीचा उत्साह दाखवला आहे. भाजपाच्या विरोधात भोसरी मतदारसंघांमध्ये भ्रष्टाचाराबद्दल वारंवार तोंडसुख घेणारे माजी आमदार आता महायुतीच्या आमदाराचा सत्कार करत आहेत यावरून चांगली चर्चा रंगली आहे.