…अन् चंद्रकांत पाटील यांनी हात जोडले
पिंपरी : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विजयी झाल्याने भाजप नेते व आमदार चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही आमदारांची भेट घेतली. आमदार अण्णा बनसोडे यांच्या पक्ष कार्यालयात पत्रकारांनी त्यांना गराडा घातला असता त्यांनी हात जोडून बोलायचे टाळले.
चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी नवा चेहरा असु शकतो, असे भाकीत केले होते. ते पुन्हा आज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. असे असताना हाच प्रश्न पुन्हा आपल्याला पडू शकतो, हे लक्षात घेऊन चंद्रकांत पाटील यांनी हात जोडत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा – मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे; गृह खात्यासाठी रस्सीखेच!
दरम्यान, पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. भेटीदरम्यान दिवंगत माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतींना उजाळा दिला. आमदार महेश लांडगे यांचे सासरे हिरामण गोडसे यांच्या काही दिवसांपूर्वी निधन झाले. आमदार लांडगे यांची भेट घेऊन त्यांनी गोडसे यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, गोडसे आणि लांडगे कुटुंबियांचे सांत्वन केले. आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या.