स्वामी विवेकानंद बालकाव्य मंचाच्या विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित
शिक्षण विश्व: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्य सरिता काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पिंपरी चिंचवड: स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद बालकाव्य मंच मोशी येथील विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांचा काव्यसंग्रह काव्य सरिता याचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिमाखात प्रकाशन करण्यात आले.
सातारा येथे झालेल्या या साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस तसेच विविध मान्यवरांच्या शुभहस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.
काव्य सरिता या बालकाव्यसंग्रहात विद्यार्थ्यांनी रचलेल्या निसर्ग, पशुपक्षी, देशप्रेम, आई वडील, कुटुंब आणि विविध नातेसंबंधांवरील भावस्पर्शी व कल्पक काव्यरचनांचा समावेश आहे. लहान वयातच साहित्यनिर्मितीची गोडी निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
हेही वाचा – भाजप नगरसेवक रवी लांडगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट
या कार्यक्रमावेळी विभागप्रमुख दिव्या भोसले व स्वाती पाटील या शिक्षिका स्वामी विवेकानंद बालकाव्य मंचाच्या वतीने उपस्थित होत्या. काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाबद्दल संस्थेचे संस्थापक विनायकराव भोंगाळे, सचिव संजय भोंगाळे, संचालिका कविता कडू पाटील, सीईओ श्रीमती अंजली भागवत तसेच मुख्याध्यापक श्रीकांत राहणे यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीला मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठामुळे स्वामी विवेकानंद बालकाव्य मंचाच्या कार्याचा गौरव झाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.




