पिंपळे निळखमध्ये कचऱ्यात आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक; परिसरात संताप

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पिंपळे निळख परिसरात एका अज्ञात व्यक्तीने नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला कचऱ्यात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांच्या लक्षात कचऱ्यात टाकलेले अर्भक आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तपासादरम्यान अर्भकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा : पुरंदर जयाद्रीच्या कऱ्हेकाठी कालासिद्धीचा शास्त्रीय नृत्यमय सोहळा
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाठवला असून, या अमानवी कृत्यामागे नेमके कोण आहे, याचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलीस सर्व शक्यता तपासून लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत.





